यंदाच्या मोसमात जिल्ह्य़ात गुरुवारी रात्री प्रथमच विजांच्या चमचमाटासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरींनी सर्वदूर हजेरी लावली.
गेले काही दिवस कोकणात सर्वत्र अतिशय तीव्र उकाडा जाणवत होता. काहीवेळा आकाश ढगांनी भरूनही येत होते. पण प्रत्यक्ष पाऊस मात्र पडत नव्हता. गुरुवारीही दिवसभर काहीसे तसेच वातावरण होते. अखेर संध्याकाळी उशिरा जिल्ह्य़च्या निरनिराळ्या भागात वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसू लागल्या आणि सर्व वातावरणच बदलून गेले. रत्नागिरी शहरात रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सुमारे तासभर संपूर्ण शहराला झोडपून काढले. या काळात शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला. रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांत अनेक ठिकाणी झाडे पडण्याचेही प्रकार घडले, तर राजापूर तालुक्यात वीज अंगावर पडल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. जिल्ह्य़ाच्या नऊ तालुक्यांपैकी मंडणगड वगळता उरलेल्या आठ तालुक्यांमध्ये या पहिल्या पावसाने एकूण सरासरी १०.४२ मिलीमीटरची नोंद केली. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यात सर्वात जास्त २२ मिलीमीटर, तर चिपळूण तालुक्यात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.