कोल्हापूर शहराला काल झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात थैमान घातले. सोसाट्याच्या वार्‍यासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह इचलकरंजी शहर परिसरात पावसाने तासभर दमदार हजेरी लावत झोडपून काढले.

यावेळी अनेक ठिकाणी वार्‍यामुळे वृक्षांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्याने अनेक भागात नुकसान झाले. तर गटारी तुडूंब भरुन रस्त्यावरुन आल्याने सखल भागात रस्त्यांचे तळे झाले होते. वादळी वारी व पावसामुळे शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

मागील आठवड्यात वरुणराजाने गुरुवारी सायंकाळी हजेरी लावत मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला होता. त्यानंतर आठ दिवसांनी गुरुवारीच पावसाने पुन्हा हजेरी लावत कडक उन्हाने हैराण सर्वांना गारवा दिला होता. काल बुधवारी शहर व परिसरात पावसाने तुरळक प्रमाणात हजर राहिली होती. आज गुरुवारी पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसताना दुपारच्या सुमारास अचानक वातावरण बदलले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. जोरदार वार्‍यामुळे पाऊस परतणार असे वाटत असताना पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने धुवांधार हजेरी लावली. सुमारे तासापेक्षा अधिक मुसळधार सरी कोसळत होत्या. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहरातील वीजप्रवाहसुध्दा खंडीत करण्यात आला. तर गटारी तुडूंब भरुन वाहू लागल्याने सखल भागातील रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते.

शहरातील सांगली रोड, संभाजी चौक ते चांदणी चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, कोल्हापूर रोड आदी भागात झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरु झाला नव्हता. पावसाच्या तासभराच्या हजेरीमुळे गटारी दुथडी भरु वाहू लागल्याने सर्व सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. त्यामुळे रस्त्यांवर तळे साचल्याचे चित्र दिसत होतो. त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. शाहू पुतळा परिसरातील सोन्या मारुती मंदिराच्या आवारातील मोठा जुना वृक्ष उन्मळून मंदिराच्या संरक्षण भिंतीवर पडल्याने तेथे मोठे नुकसान झाले आहे. मोहन आरकेड या व्यापारी- निवासी संकुलाच्या छतावरील मोबाईल टॉवर कोसळला.कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.