रायगड जिल्ह्य़ातील पर्जन्यमानात यावर्षी मोठी तूट दिसून आली आहे. जिल्ह्य़ात सरासरी पावसाच्या केवळ ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यांत तर सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी ३ हजार १४२ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. यावर्षी मात्र जिल्ह्य़ात सरासरी २ हजार ००२ मिलिमीटर पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्य़ात तब्बल हजार मिलिमीटरने कमी पाऊस पडला. म्हणजेच यावर्षी जिल्ह्य़ात सरासरीच्या ६४ टक्केच पावसाची नोंद झाली. कोकणात या वर्षी मान्सून उशिराने दाखल झाला होता. जून महिन्याच्या उत्तरार्धात मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जुल आणि ऑगस्ट महिन्यांत फारसा पाऊस झाला नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रायगडकरांना अपेक्षित पावसाच्या सरी कोसळल्याच नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्य़ातील पावसाचे ऋतुचक्र बदलले असले तरी कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत होता. त्यामुळे नियमित सरासरी गाठली जात होती. या वर्षी मात्र पाऊस आपली सरासरी गाठणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्य़ातील अनेक भागांत पाण्याचे दुíभक्ष जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग, माथेरान, पनवेल, उरण, पेण या परिसरांत इतर भागांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. मात्र श्रीवर्धन, रोहा, महाड, पोलादपूर तालुक्यात सरासरीच्या जेमतेम ५० टक्के पावसाची नोंद झाली. ही एक चिंतेची बाब आहे. अलिबाग तालुक्यात सरासरीच्या ८२ टक्के, पेण तालुक्यात ६८ टक्के, मुरुड तालुक्यात ६४ टक्के, पनवेल तालुक्यात ६१ टक्के, उरण तालुक्यात ७१ टक्के, कर्जत तालुक्यात ७२ टक्के, खालापूर तालुक्यात ६० टक्के, माणगाव तालुक्यात ६५ टक्के, रोहा तालुक्यात ६१ टक्के, सुधागड तालुक्यात ५० टक्के, तळा तालुक्यात ६९ टक्के, महाड तालुक्यात ५७ टक्के, पोलादपूर तालुक्यात ५४ टक्के, म्हसळा तालुक्यात ५८ टक्के, श्रीवर्धन तालुक्यात ५२ टक्के तर माथेरान येथे सरासरीच्या ८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिना संपत आल्याने आता मान्सून आपल्या परतीच्या प्रवासाला लागला आहे. आगामी काळात फारसा पाऊस होण्याची शक्यताही दिसून येत नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील अनेक भागांत उन्हाळ्यात पाण्याचे दुíभक्ष जाणवण्याची शक्यता आहे. कोकणात राज्यातील इतर भागांच्या तुलनेत किती तरी जास्त पाऊस पडतो, मात्र योग्य नियोजनाअभावी हे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात नद्या, नाले, विहिरी, िवधण विहिरी कोरडय़ा पडतात. त्यामुळे उन्हाळ्यातील दोन-तीन महिने पाण्याचे दुíभक्ष जाणवत असते. या वर्षी सरासरी पर्जन्यमानात मोठी घट झाल्याने ही परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.