कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यासह कर्नाटकातून जवळपास साडे चार लाख भाविक दाखल झाले.मात्र,यंदाच्या कार्तिकी वारीला अवकाळी पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केली. राज्यातील शेतकऱ्यांना सुखी कर असे साकडे पाटील यांनी विठूरायाला घातले.

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुंबई,कोकण,नांदेड, परभणी,विदर्भासह कर्नाटकातून भाविक दर वर्षी येतात. मात्र राज्यातील अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान, हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज या कारणाने पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या घटलेली दिसून आली. यंदाच्या एकादशीसाठी जवळपास साडे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले. एकादशीला भल्या पहाटे भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान केले. त्यानंतर नगर प्रदक्षिणा करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केली. त्यांच्या बरोबर  पूजेचा मान सांगली जिल्ह्यतील मिरज तालुक्यातील बेडग येथील सुनील महादेव ओमसे आणि नंदा सुनील ओमसे या दाम्पत्याला मिळाला. सुनील ओमसे हे शेतकरी असून २००३ पासून पंढरीची वारी करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना श्री विठ्ठलाकडे केल्याची भावना सुनील ओमसे यांनी व्यक्त केली. तर, राज्यातील  शेतकरी आणि सामान्य जनता  सुखी होऊ  दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.एकंदरीत कार्तिकीचा अनुपम्य सोहळा विठुरायाच्या जयघोषाने मोठय़ा उत्साहात पार पडला.

आकर्षक फुलांनी मंदिर सजले

कार्तिकी एकादशी निमित्त पुण्यातील राम जांभूळकर या भाविकाने नामदेव पायरी ते पश्चिमद्वारापर्यंत विविध १७ प्रकारच्या फुलाची सजावट केली होती. या कामी जवळपास ५ टन फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिरातील गर्भगृह,कमानी,सोळखांबी,सभागृह,प्रवेशद्वार आदी फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिराची शोभा वाढली होती. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचे रूप अधिकच खुलले होते.