मोसमी पाऊस पुन्हा राज्यभर सक्रिय

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या विविध भागात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी मुसळधार पाऊस पडला. मराठवाडय़ात हलका, तर कोकणात जोरदार पाऊस बरसला. पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यावर मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता रविवारी वाढली. त्यामुळे पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या चोवीस तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढू शकणार आहे. त्यामुळे सध्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस न झालेल्या मराठवाडय़ासह राज्याच्या अंतर्गत भागामध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २३ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्याचप्रमाणे २४ जुलैला मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील चोवीस तासांमध्ये प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रामध्ये नैर्ऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला झाला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भासह मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मागील चोवीस तासांत प्रमुख ठिकाणी नोंदविला गेलेला पाऊस (मि. मी.) पुढील प्रमाणे-  जव्हार ११०, मोखाडा, माथेरान ९०, शहापूर ८०, लांजा ७०, विक्रमगड ६०, अंबरनाथ, उल्हासनगर ५०, पनवेल, पेण, फोंडा, सावंतवाडी, तलासरी, वाडा ४०. मध्य महाराष्ट्रातील लोणावळा १००, गगनबावडा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ८०, हरसूल, इगतपुरी, महाबळेश्वर, पेठ ७०, राधानगरी ५०.  विदर्भातील कोची ६०, अकोला,उमरेड ४०, भिवपूर, कुरखेडा, लाखांदूर ३०. घाटमाथा परिसरातील अम्बोणे, शिरगाव १३०, दावडी १२०, लोणावळा (टाटा), वळवण, खोपोली, ताम्हिणी ९०, कोयना (नवजा) ८०, डुंगरवाडी ७०, शिरोटा, वाणगाव ६०, धारावी, भिरा ५०,ठाकूरवाडी ४०, भिवपुरी, खांद ३०, कोयना (पोफळी) २०.