कोल्हापूर आणि कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. लातूरजवळच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर कोल्हापुरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुण्यातील विश्रांतवाडी भागात पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. वीज कडाडून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हवेतही काहीसा गारवा निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्येही पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे पार्थ पवार यांच्या प्रचाराची सभा थांबवण्यात आली आहे. तर कोकणासह काही भागात पावसाचे ढग दाटून आले आहेत. या ठिकाणीही पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात अशी शक्यता आहे.

कोल्हापूर, कोकण आणि मराठवड्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात आणि पिंपरी भागातही पाऊस सुरू झाला आहे. वीज कडाडून पाऊस सुरु झाला आहे असेही समजते आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गोळवली येथे काही प्रमाणात गारा पडल्या अशीही माहिती समजते आहे. कोकणात काही ठिकाणी हलक्या सरींसह गारांचा पाऊस झाल्याचेही समजते आहे.

पुण्यातील जुन्नर, मंचर, राजगुरूनगर, चाकण या भागांमध्येही पाऊस कोसळतो आहे. काही हलक्या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा आला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांनाही काही अंशी दिलासा मिळाला आहे.

 

पुण्यातही काही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत असं स्कायमेटने म्हटलं आहे यासंदर्भातले काही फोटोही स्कायमेट वेदरने ट्विट केले आहेत.