सांगली : मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळाने शिराळा औद्योगिक वसाहतीसह भटवाडीला शनिवारी जोरदार तडाखा दिला. वादळामुळे छताचे पत्रे उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या वादळामध्ये पाच महिला जखमी झाल्या आहेत. वादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना आ. मानसिंगराव नाईक यांनी महसूल विभागाला रविवारी दिल्या.

शिराळा येथील औद्योगिक वसाहत तसेच भटवाडी, करमाळे आदी गावांमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठा तडाखा दिला. अनेक कारखान्यांचे पत्रे वादळामुळे पत्त्याप्रमाणे उडून एक किलोमीटर अंतरावर जाउन कोसळले. लोखंडी अँगलसह पत्रे जाऊन दूरवर पडले. विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये वादळामुळे उडालेले पत्रे लागल्याने पाच महिला जखमी झाल्या. यामध्ये इकोराईज बायो फर्टलिायझर कंपनीमधील मेघा पाटील ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तसेच नूतन डांगे, सविता निकम, स्न्ोहल मस्के या तिघीही जखमी झाल्या. तर भटवाडी येथे अर्चना चव्हाण ही महिलाही जखमी झाली.

वादळामुळे भटवाडी येथील प्रकाश चव्हाण, विकास चव्हाण, दीपक चव्हाण, सुभाष चव्हाण, हंबीर चव्हाण, शीला चव्हाण, युवराज चव्हाण, राजाराम चव्हाण, आकाराम चव्हाण, बाबासाहेब फडतरे यांच्या घराचे नुकसान झाले आहे.   आ. नाईक यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची रविवारी पाहणी केली. वादळी पावसात विविध कंपन्यांचे पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे, नवीन बांधकाम जमीनदोस्त होणे आदी प्रकार घडले आहेत. काही नागरिकांना, महिलांना छताचे उडालेले पत्रे लागून गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत औद्योगिक वसाहतीमधील कंपनी मालकांशी चर्चा केली. भटवाडी व करमाळे येथील घरांचे पत्रे उडून गेले आहेत. प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. याबाबतही गावकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यातील उत्तर भागातील अनेक गावांना या ढगफुटीसदृश वादळी पावसाचा शेती, घरांना, रानातील वस्त्यांना मोठा फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी सूचना तहसीलदारांना दिली आहे. या वेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते.

वादळी वाऱ्याने शिराळा औद्योगिक वसाहतीमधील इमारतीच्या छताचे उडालेले पत्रे.