राज्यातील ३५८ पैकी ३२५ तालुक्यांतील ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई : अवकाळी पावसाने ९० टक्के महाराष्ट्राला जबर तडाखा दिला असून ३५८ पैकी ३२५ तालुक्यांतील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळबागांची वाताहत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री व आमदारांना दिला असून नुकसान झालेल्या भागाचे तातडीने ड्रोन सर्वेक्षण करावे असा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि सरकारी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी वर्षां या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी बैठक बोलविण्याचा निर्णयही फडणवीस यांनी घेतला.

‘पाहणी दौरे’ जोमात

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी नाशिकचा दौरा केल्यानंतर राजकीय कुरघोडय़ांना वेग आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवार ३ नोव्हेंबर रोजी मराठवाडय़ात कन्नड आणि वैजापूर तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले व त्याचे वेळापत्रकही प्रसारित झाले. त्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी शनिवारी व रविवारचा पाहणी दौरा जाहीर केला. त्यामुळे नवे सरकार स्थापन होण्याआधीच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्यात शेतकऱ्यांच्या मदतीवरून कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र समोर आले.

झाले काय? : विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी काढलेली नुकसानीची छायाचित्रेही पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी, दुष्काळाच्या काळात उभारली, तशीच यंत्रणा उभारावी, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साधारणपणे ५३ हजार हेक्टरवरील फळबागा, एक लाख ४४ हजार हेक्टरवरील भातपीक, दोन लाख हेक्टरवर ज्वारी, दोन लाख हेक्टरवर बाजरी, पाच लाख हेक्टरवर मका, १९ लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे १९ लाख हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.

विभागनिहाय नुकसान

कोकण – ४६ तालुके (९७ हजार हेक्टर)

नाशिक – ५२ तालुके (१६ लाख हेक्टर)

पुणे – ५१ तालुके (१ लाख ३६ हजार हे.)

औरंगाबाद – ७२ तालुके (२२ लाख हे.)

अमरावती – ५६ तालुके (१२ लाख हे.)

नागपूर – ४८ तालुके (४० हजार हेक्टर)