यंदाच्या मोसमात पावसाने शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच संततधार ठरल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता. मंडणगड तालुक्यातील भारजा, निवळी या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. उमरोली-शिपोशी मार्गावर तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. शहर परिसरात पावसाचे पाणी साचले असून काहींच्या घरांना धोका निर्माण झालेला होता. चिपळूणमध्ये परशुराम नगरात पावसाचे पाणी साचून ते घरात घुसले आहे. खेर्डी परिसरातही पाणी साचले. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून राहिल्याने काही ठिकाणी महामार्गावर चिखल आला आहे. राजापुरात कोदवली आणि अर्जुना या दोन नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. रत्नागिरीतील काजळी नदीचे पाणी वाढले असून पावसाचा जोर कायम राहिला असता तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी, बावनदी, असावी, शास्त्री या नद्यांचे पाणी भातशेतीत पाणी घुसले होते. काही ठिकाणी नदीचे प्रवाहही बदलत आहेत. नदीकिनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात (३ जून) ‘’निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. पण वादळ शमल्यानंतर ११ जूनपर्यंत उघडीप राहिली. त्या आठवडय़ात मान्सूनचे धीम्या गतीने आगमन झाले. पण थोडय़ाच दिवसात पुन्हा उघडीप झाली. त्यानंतर गेल्या गुरूवारपर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून पडत राहिल्या. पण त्यापाठोपाठ काही वेळा ऊनसुध्दा पडले. त्यामुळे पावसाव्यतिरिक्त पाण्याचा अन्य पर्याय नसलेल्या गावांमध्ये भाताच्या लावण्या रखडल्या. गेल्या दोन दिवसांपासून मात्र जिल्ह्यात चांगले पावसाळी वातावरण निर्माण झाले. शनिवारी तर पहाटेपासूनच पावसाने संततधार धरली आणि संध्याकाळी उशीरापर्यंत तो पडतच राहिला.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ४५.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी गुहागर तालुक्यात सर्वात जास्त, ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल  राजापूर (६० मिमी), रत्नागिरी (५९), लांजा (५३.१), दापोली (४८) आणि चिपळूण (४१ मिमी) याही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडला.  पावसाचा जोर सोमवारपर्यंत कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.