खरिपाच्या पेरण्यांची आता हातघाई

कराड : पश्चिम घाट क्षेत्रातील जलसाठे गेल्या पाच दिवसांत कोसळलेल्या दमदार पावसाने चांगलेच वधारले आहेत. सततच्या आणि पेरणीस पोषक पर्जन्यवृष्टीने खरीप पिकांच्या लागवडीची आता हातघाई सुरू आहे. सलग कोसळणाऱ्या पावसाने आज रविवारी पाचव्या दिवशी उसंत घेताना, लख्ख सूर्यप्रकाशामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

मान्सूनच्या पहिल्या सत्रातील तुफान मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असले तरी, धरणसाठय़ांची टक्केवारी समाधानकारक वाढली आहे. गेल्या पाच दिवसांत कोयना शिवसागराचा पाणीसाठा १३ टीएमसीने वाढून ४० टीएमसी (३८ टक्के) झाला आहे.

वारणा, तारळी व उरमोडी ही धरणे निम्म्याहून अधिक भरली आहेत. दोन तृतीयांश भरलेल्या उरमोडीतून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. वारणेचा पाणीसाठा ५१ टक्के असून तारळीचा पाणीसाठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व दूधगंगा  ही प्रमुख धरणे ३७ टक्क्यांवर भरली आहेत. गेल्या ३६ तासांत पावसाचा जोर ओसरल्याने दुथडी वाहणाऱ्या कृष्णा-कोयना तसेच पात्राबाहेरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीसह उपनद्यांच्याही पाणीपातळीत घट झाली आहे. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या ८ तासांतील पाऊस, कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये असा- कोयना धरण ६ (८८०), कुंभी १९ (१,१५८), दूधगंगा २१ (७२३), धोम-बलकवडी २ (४१९), धोम १ (२८१), उरमोडी २ (४५४), कडवी ६ (६२०) असा धरणक्षेत्रातील पाऊस असून, कास तलाव ३ (८१२), ठोसेघर धबधबा ५ (५५७) मि. मी. पाऊस झाला आहे. आज दिवसभरात दूधगंगा धरण व दाजीपूरला सर्वाधिक २१ मि.मी. पावसाची नोंद आहे. तर आजवरचा सरासरी १,२९५ मि.मी. असा उच्चांकी पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे कोसळला आहे.

धरणसाठा ५० टक्क्यांहून अधिक

सांगली : दोन दिवसाच्या संततधार पावसानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली असून ऊन, सावलीचा खेळ आज दिवसभर सुरू होता. पश्चिम भागात पावसाची गती मंदावली असली तरी पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात असल्याने चांदोली धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्याहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्य़ात सरासरी ९.५ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

दोन दिवस पावसामध्ये सातत्य होते. कधी हलक्या सरी तर कधी मुसळधार पाऊस पडत होता. मात्र शनिवार रात्रीपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. आज दिवसभर उन्हाचा कडकाही अधूनमधून जाणवत होता.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १२.१ (२२७.६), जत ३.७ (१२७.७), खानापूर-विटा ८.९ (९२.४), वाळवा-इस्लामपूर १०.४ (२३३.३), तासगाव ९.६ (१५३.७), शिराळा १९.५ (३३२.६), आटपाडी ४.८ (८०.७), कवठेमहांकाळ ५.३ (१३६.३), पलूस ७.८ (२१४.५), कडेगाव ९.६ (१६९.५)

जिल्ह्यातील चांदोली धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १७.४३ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

अन्य धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना ३९.७१ (१०५.२५), धोम ५.५९ (१३.५०), कन्हेर ३.६६ (१०.१०), दूधगंगा  ९.४५ (२५.४०), राधानगरी ३.०८ (८.३६), तुळशी १.८५ (३.४७), कासारी १.०४ (२.७७), पाटगांव १.८२ (३.७२), धोम बलकवडी ०.९६ (४.०८), उरमोडी ६.४० (९.९७), तारळी ३.४३ (५.८५), अलमट्टी  ५१.४१ (१२३).

विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फुटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड १२.६ (४५), आयर्वनि  पूल सांगली २०.०५ (४०) व अंकली पूल हरिपूर २५.११ (४५.११).