पुणे : राज्याच्या सर्वच विभागांत पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण आणखी पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या काळात दुपापर्यंत निरभ्र आकाशामुळे ऊन, तर त्यानंतर अंशत: ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे आठवडय़ापासून राज्यात पावसाळी स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी या काळात पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन ते सरासरीच्या खाली आले आहे. संध्याकाळनंतर अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानातही घट झाली आहे. कोकण विभागात मात्र मुंबईसह सर्वत्र कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात आता कर्नाटक आणि लगतच्या भागावर सरकला आहे. मात्र, महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ५ मे रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहणार आहे. याखेरीज ७ मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाटय़ाचा वारा वाहून मेघगर्जना होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, महाबळेश्वर, नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुका, औरंगाबाद, विदर्भातील नागपूर, गोंदिया आदी भागांत सोमवारी संध्याकाळी पावसाची नोंद झाली.