राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या तिन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊ आणि राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्रातले दोन ब्रांड आहेत असं म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातले उत्तम वक्ते म्हणून हे तिघे परिचित आहेत. आता हे तिघे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर राजकीय टोलेबाजी होणार यात काही शंकाच नाही. राजकीय वर्तुळात हे तिघे कशी आणि काय टोलेबाजी करणार याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबरिश मिश्र यांनी सुप्रिया सुळेंना भेटून त्यांचं पुस्तक भेट दिलं होतं. सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा फोटोही फेसबुकवर शेअर केला होता.

अंबरिश मिश्र हे पत्रकार आणि लेखकही आहेत. राजकारणातील बदलत्या घडामोडींचं अवलोकन करण्याची त्यांची अशी एक वेगळी हातोटी आहे. अशात त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला तीन दिग्गज नेते एकत्र येत आहेत. नजीकच्या काळातली ही अशी पहिलीच वेळ आहे. ज्यावेळी हे तीन नेते एकत्र येत आहेत. २०१७ मध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांची जाहीर मुलाखत पुण्यात घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत सामनसाठी घेतली होती. त्यावेळी या दोन नेत्यांच्या खुमासदार शैलीचं दर्शन महाराष्ट्राला झालं होतं. संजय राऊत हे देखील उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. आता राज ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना.. त्यामुळे राजकीय वर्तुळात हे तीन नेते एकाच मंचावर काय बोलणार? काय टोलेबाजी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.