News Flash

करोनाचा उगाच बाऊ का केला जात आहे?; राज यांचा ठाकरे सरकारला सवाल

करोनासंदर्भात राज यांना विचारण्यात आला प्रश्न

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज औरंगाबादमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी औरंगाबादेत दाखल झाले. एकीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मेळावे आणि सभा रद्द होत असताना मनसेने हा कार्यक्रम आयोजित केल्यासंदर्भात पत्रकारांनी राज यांना प्रश्न विचारला. त्यावेळेच त्यांनी मनसेचा कार्यक्रम आणि शोभा यात्रा होणार असं सांगितलं. तसेच करोनाबद्दल उगाच बाऊ का केला जात आहे असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन त्यांनी महाराष्ट्रात करोनामुळे एकही रुग्ण दगावला नसल्याचे सांगितले.  राज्याचे प्रशासन उगाच लोकांना घाबरवत आहे. एकही रुग्ण दगावला नाही मग उगाच बाऊ का केला जात आहे असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे. “आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाच्या केसेस नसताना जो काही आव आणला जात आहे ते काही योग्य नाही. महाराष्ट्रात तरी करोनाचा एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे एवढं घाबरुन जाण्यासारखं काही नाहीय. काळजी घेणं गरजेचे आहे.  काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे यात दुमत नाहीच,” असं मत राज यांनी करोनासंदर्भात बोलताना नोंदवलं आहे. तसेच मनसेने आयोजित केलेला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम आणि शोभा यात्रा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल असा विश्वासही राज यांनी यावेळी बोलून दाखवला.

…म्हणून औरंगाबाद?

राज ठाकरे यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यात त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे फलकावर लिहून महापालिकेच्या निवडणुकीत मनसे भगवा झेंडा अधिक उंचावून धरेल असे संकेत दिले होते. तसेच निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी तिथीनुसार मनसेकडून शिवजयंती साजरी केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. शिवजयंतीचा हा उत्सव संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी मनसेला उपयोगी पडेल असे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेला मागे टाकण्यासाठी

अलिकडेच मनसेकडून संघटनात्मक बदलही करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सुहास दाशरथे यांच्याकडे देण्यात आली, तर राज्याचे उपाध्यक्ष म्हणून सुमीत खांबेकर यांची निवड झाली. दरम्यानच्या काळात मनसेकडून आंदोलने करण्यात आली. त्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन हेही सहभागी झाले होते. संघटनेला बळ देणारा राज ठाकरे यांचा दौरा एका बाजूला सुरू असतानाच शिवसेनेचे मुद्दे मनसेच्या व्यासपीठावरून अधिक जोरकसपणे लावले जात आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, अशी मागणी भाजपकडूनही रेटली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला मागच्या बाकावर ढकलता यावे म्हणून भाजप आणि मनसेकडून प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनेही शहराचे नाव बदलता येऊ शकते काय, याची चाचपणी करायला सुरुवात केली आहे.

तिहेरी चुरस

एका बाजूला शहराचे नाव बदलावे यासाठीच्या मागण्या आणि प्रशासकीय पातळीवरच्या हालचाली सुरू असतानाच भगवा झेंडा अधिक उंच कोणाचा, अशी शर्यत लागल्यासारखे वातावरण तीन पक्षांत दिसून येते. त्यात सेना-भाजपच्या बरोबरीने मनसेही उतरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 9:16 am

Web Title: raj thackeray about coronavirus spread in maharashtra scsg 91
Next Stories
1 “…म्हणून आम्ही भाजपामध्ये गेलो”, सुजय विखेंनी दिली कबुली
2 करोनाचं नागपूरमध्ये पाऊल; महाराष्ट्रात ११ रुग्णांवर उपचार सुरू
3 .. तर बाबरी मशीद वाचली असती; शरद पवार यांचा गौप्यस्फोट
Just Now!
X