पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज सोमवारचा भंडारा जिल्ह्य़ाचा दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे गेल्या १५ मार्चपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असून आतापर्यत चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्य़ाचा दौरा आटोपून रविवारी सायंकाळी नागपूरला परतले. चंद्रपूरला गेले असताना वणीला जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन एका रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले. रविवारी सायंकाळी राज ठाकरे नागपुरात परतल्यावर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी सकाळी भंडारा जिल्ह्य़ात जाऊन त्या ठिकाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. त्याप्रमाणे तेथील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, मात्र रविवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्य़ाचा दौरा रद्द करण्यात आला.
दरम्यान भंडारा जिल्ह्य़ाचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे तो कुठल्या कारणावरून करण्यात आला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील अनेक कार्यकर्ते आज नागपूरला आले असून त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे विदर्भाचा दौरा अर्धवट सोडून जाणार काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
या संदर्भात मनसेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांचा दौरा सुरू असून त्यांना थकवा आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आरामाची गरज असल्यामुळे केवळ भंडारा जिल्ह्य़ाचा दौरा रद्द करण्यात आला असून उर्वरित दौरा नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे. आज दिवसा त्यांनी रविभवनात आराम केला असून ते कोणालाही  भेटले नाहीत. फक्त काही प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला असून दिवसभर आराम केला. कुठल्याही कार्यकर्त्यांने भेटू नय, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उद्या, मंगळवारी सकाळी रविभवनमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. नागपूरची बैठक घेऊन ते यवतमाळला रवाना होणार आहेत. २० मार्चला यवतमाळ व वाशीम जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यानंतर २१ मार्चला बुलढाण्यातील लोणारमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन २२ मार्चला सकाळी शेगावला आणि त्यानंतर दुपारी अकोला येथे बैठक घेऊन २३ तारखेला ते अमरावतीला येणार आहेत. २४ मार्चला सकाळी अमरावतीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सायंकाळी त्यांची विदर्भातील बहुप्रतीक्षित जाहीर सभा होणार आहे. अमरावतीची सभा आटोपून दुसऱ्या दिवशी सकाळी ते नागपूरला परत येतील आणि दुपारी मुंबईकडे रवाना होतील, असेही गडकरी यांनी सांगितले.