राज ठाकरे यांचा दावा; दुष्काळी भागाची पाहणी
राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारच्या विकास आराखडय़ातील सर्व योजना माझ्याच ब्ल्यू प्रिंटमधील आहेत, असा दावा करीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी, माझ्या ब्ल्यू पिंट्रच्या आधारे विकास आराखडा तयार करताना मला भाजप साधी शाबासकी द्यायलाही तयार नाही. भाजप म्हणजे थापांचा पर्यायी शब्द बनल्याची खोचक टीका केली.
मराठवाडय़ातील परांडा, कळंब, निलंगा आदी ठिकाणच्या न्यायालयांमध्ये हजर राहण्यासाठी तसेच मराठवाडय़ातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे हे दोन दिवसांच्या भेटीवर आले होते. गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी ठाकरे यांनी आपल्या ब्ल्यू प्रिंटसह राज्यात पडलेला दुष्काळ, पाणीप्रश्न, केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा कारभार, स्वतंत्र विदर्भ, व्यंगचित्रकला आदी विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.
देशात व राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराची पद्धत पाहिली असता यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा भाजप-सेना युती सरकार काही वेगळे नाही, अशी मल्लिनाथी करताना ठाकरे म्हणाले, राज्यात दुष्काळाचे संकट असताना त्यावर मात करण्यासाठी भाजप केवळ बाता करीत काहीच कृती करीत नाही. दुष्काळ निवारणासाठी राज्यात ४४ हजार गावांमध्ये ३३ हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. एवढय़ा विहिरी बांधल्या तर त्या आहेत कोठे? एकावर एक मोबाइल टॉवरसारखे या विहिरी बांधल्या का? जुन्या विहिरी गेल्या कोठे? एवढय़ा विहिरी बांधून तरी दुष्काळ संपला का, असे सवाल आपल्या खास शैलीत उपस्थित करताना ठाकरे यांनी ‘थापा’ या शब्दाला पर्यायी शब्द कोणता असेल तर तो म्हणजे भाजप, अशी खोचक टीका केली. जनतेने मोठय़ा अपेक्षा बाळगून केंद्रात व राज्यात भाजपच्या हाती सत्ता दिली आहे, परंतु सत्ता चालवताना केवळ थापेबाजी करून चालणार नाही. पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी काय केले, याची उणीदुणी न काढता जनतेने दिलेली सत्ता नीट चालवावी, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. भाजपकडे जाणती माणसेच नाहीत. भाडय़ाने माणसे आणून त्यांना ते लढवितात, असा टोलाही त्यांनी लगावला.