राज्यातील लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन आणि पोलिसांकडून होत असलेल्या दुजाभावाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “सुरूवातीच्या काळातील उपाययोजना सोडल्या, तरी सध्या भासवल्या जाणारी स्थिती दिसत नाही. ज्या पद्धतीनं काम व्हायला हवं होतं, ते दिसत नाही. म्हणजे रमजानसाठी सगळीकडे रस्ते भरले आणि आम्ही रस्त्यावर आलो की बांबू खावे लागणार, असं कसं चालेल,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोना आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर आपली भूमिका मांडली. “सुरूवातीच्या काळातील गोष्टी सोडल्या तर सध्या काही बरोबर चाललं आहे, असं मला दिसत नाही. सगळे जण बसून निर्णय घेतात आणि ते लोकांसमोर येतात असं चित्र मला तरी आता दिसत नाही. जी लोकं काही गोष्टी सांगत आहेत, त्या गोष्टी पटकन व्हायला हव्यात. जसं की दुकानं उघडी ठेवण्याबद्दल असेल. रमजान सुरू आहे. त्या सणासाठी सगळे रस्तेच्या रस्ते भरले आहेत. असं करून चालेल? त्यांच्या सणासाठी तुम्ही कोणतेही रस्ते भरून टाकणार, ते कसेही रस्त्यावर येणार आणि आम्ही लोकं रस्त्यावर आल्यावर त्यांना बांबू खायला लागणार, हे काही बरोबर नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ज्यावेळी अश्या प्रकारे संकट येतं त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धर्म असता कामा नये. त्यावेळी सगळ्यांना समान न्याय आणि वागणूक असली पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचा धर्म आहेच की? आम्हाला नाही का आमचा धर्म? आमचे सण आणि उत्सव आम्ही घरामध्ये साजरे केले. अगदी १४ तारखेची आंबेडकर जयंती माझ्या दलित बांधवांनी घरामध्ये साजरी केली. सगळ्या धर्माची लोक आपापले सण उत्सव घरामध्ये साजरे करतायेत मग अशा ठराविक लोकांसाठी अशा गोष्टी का होतायेत? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

हा कुठचा थिल्लरपणा?

“हे करत असताना तुम्हाला कठीण निर्णय घेणं आवश्यक आहे. तुम्ही दोन तास दुकानं कशाला उघडी ठेवता? दुकानं दिवसभर उघडी ठेवा. ज्या लोकांना जेव्हा जायचं तेव्हा जातील. रांगे उभे राहतील अंतर ठेवतील. तुम्ही दोन तास दुकानं उघडी ठेवणार. मग झुंबड होणार. मग पुन्हा सरकार म्हणणार कुणी नियमांचं पालन करत नाही म्हणून आम्ही दुकानं बंद करतो. हा कुठचा थिल्लरपणा?,” अशा शब्दात राज यांनी सरकारी निर्णयांचा समाचार घेतला.