‘शेतकऱ्यांनो, दुखे सर्वांनाच असतात, पण आत्महत्या हा त्यावर उपाय नाही आणि मरायचेच असेल तर नुसतेच कशाला मरता? ज्यांनी तुमच्यावर अन्याय, अत्याचार केला त्यांना मारून मरा,’ असा धक्कादायक सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे देऊन खळबळ निर्माण केली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मनसेचे राजू राजे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते सोमवारी बोलत होते.
महायुतीच्या सेना उमेदवार खासदार भावना गवळी गेले १५ वर्षे खासदार आहेत, परंतु त्यांनी लोकांची कुठलीच कामे केली नाहीत. खासदार स्वतच्याच तुमडय़ा भरण्यात मग्र आहेत. त्यामुळे या भागात कालवे कोरडे आहेत आणि देशी दारूच्या दुकानात पूर वाहतोय. या जिल्ह्य़ाचा अतिशय महत्वाचा असलेला रेल्वेचा प्रश्न त्यांनी सोडविलेला नाही. हा एक प्रश्न जरी त्यांनी सोडविला असतात तर मी त्यांच्या प्रचाराला आलो असतो. कांॅग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या देशाला बरबाद करीत आहेत, असा आरोप राज यांनी केला.
गारपीट झाली तेव्हा मी या जिल्ह्य़ात येऊन गेलो. त्याचवेळी राष्ट्रवादीचे शरद पवार जे देशाचे कृषीमंत्री आहेत आणि कांॅग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले, परंतु राष्ट्रवादीचा उमेदवार असलेल्या ठिकाणी पवार गेले, तर कांॅग्रेसचा उमेदवार असलेल्या भागात चव्हाण गेले, परंतु शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही नेते आलेच नव्हते. ते आले होते त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी, अशी टीका त्यांनी केली. भावना गवळी स्वतला महिला उमेदवारांच्या प्रतिनिधी म्हणवतात, पण याच जिल्ह्य़ात कुमारी मातांचा प्रश्न जगभर गाजत आहेत. भावना गवळींनी काय केले, असा सवाल ठाकरे यांनी केला.

‘राजे’ नव्हे ‘राज’साठी गर्दीचा उच्चांक
मनसे उमेदवार राजू राजे पाटील यांच्या प्रचारासाठी नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ऐकायला व पहायला आम्ही आलो आहोत, अशी प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केली. पोस्टल ग्राउंडवरच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांपेक्षाही मोठी सभा राज ठाकरे यांची होती. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राहुल गांधी, उध्दव ठाकरे यांच्या सभांना झालेल्या गर्दीपेक्षाही प्रचंड गर्दी राज ठाकरेंच्या सभेला होती.