माजी केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वर्तुळातील महत्त्वाचे नेते जसवंत सिंग यांचं आज निधन झालं. सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जसवंत सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करत त्यांना अभिवादन केलं.

जसवंत सिंग यांना आज (२७ सप्टेंबर) सकाळी ह्रदयविकाराच झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर मनसे अध्यक्ष यांनी सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“पोखरण-२च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेनं भारतावर आर्थिक निर्बंध लादले. अशा वेळेस जसवंत सिंग यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक. जसवंत सिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन,” अशा भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जसवंत सिंग यांच्या निधनांवर शोक व्यक्त केला. “जसवंत सिंह यांनी मनोभावे देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ राजकारणातून. अटलजींच्या सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आणि अर्थमंत्री, संरक्षण व परराष्ट्र क्षेत्रात छाप सोडली. त्यांच्या निधनानं दुःखी आहे,” अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.