मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये झालेल्या भाषणात भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र त्याचवेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे हेदेखील अचूक ओळखले. शिवसेना सातत्याने भाजपाला विरोध करत आहे. आम्ही भाजपासोबत यापुढे निवडणूक लढवणार नाही, नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा आणि मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते ते आपल्याला पाहायचे आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो की शिवसेना घरंगळत जाऊन भाजपाला साथ देणार असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

शिवसेनेचा भाजपाला एवढा विरोध असेल तर त्याची सुरुवात उद्यापासून अविश्वास प्रस्तावापासूनच होऊं दे असे राज म्हणाले. शिवसेनेने कितीही भाजपाला विरोध दाखलवा तरी ते घरंगळत जाणार हे मला ठाऊक आहे. कितीही विरोध केला तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाही. स्वत:च्या तुंबडया भरत रहाणार असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरेंनी हे वक्तव्य ज्या भाषणात केले ते भाषण संपल्यावर दहाच मिनिटात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना व्हिप जारी केला आणि राज ठाकरे म्हटल्याप्रमाणेच भाजपाला साथ देत मित्र धर्म निभावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी म्हटल्या प्रमाणे शिवसेना भाजपालाच साथ देणार हे उघड होते, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मनातले ओळखल्याची चर्चा रंगली आहे.