मराठवाडय़ाचा आपला दौरा दुष्काळ पाहणीचा नाही, तर पक्षसंघटन बांधणीचा असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील दौऱ्यांमध्ये स्थानिक मुद्दय़ांनाही हात घालू, असेही ते म्हणाले.
जालना येथे उद्या (शनिवारी) राज यांची जाहीर सभा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पत्रकार बैठकीत त्यांनी हा खुलासा केला. गेल्या काही दिवसांत मराठवाडय़ाच्या दौऱ्यात संघटनात्मक पातळीवर अनेकांचा ‘एमआयआर’ स्कॅन पूर्ण झाला आहे. मात्र, अजून निष्कर्षांप्रत आलेलो नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांना ग्रामीण भागातले काही कळत नाही, असा नेहमी आरोप होतो. त्याबाबत ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे मी फिरत आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन-तीन वेळा जाऊन आलो आहे. याउपरही मला कळत नसेल तर ज्यांना कळते त्यांनी काय केले? शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. दुष्काळ पडतोच आहे. टंचाई आहेच. मुळात ज्यांना प्रश्न विचारायला हवेत, त्यांना विचारले जात नाही. नाशिकमध्ये काय केले, हे मला मात्र विचारता. पाच वर्षे व्हायची आहेत. माझी ‘ब्ल्यू प्रिंट’ विचारली जाते, मग सत्ताधाऱ्यांचे ‘व्हिजन’ का विचारले जात नाही, असा सवालही त्यांनी केला. मूलत: बऱ्याच गोष्टी मी ज्या बोलतो, त्या येत नाहीत. नको त्या बातम्या तापविल्या जातात. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेला ज्या पद्धतीने प्रसिद्धी मिळाली आणि जशा मेणबत्त्या बाहेर आल्या, त्या भंडाऱ्याच्या घटनेनंतर का पुढे आल्या नाहीत. त्या विझल्या का, असा प्रश्नही त्यांनी केला.
संघटनात्मक बांधणीसाठी माझा दौरा सुरू आहे. येत्या काळात स्थानिक पातळीवरचे मुद्दे उचलण्यासाठी सभांचा दुसरा टप्पा हाती घेणार असून तालुकास्तरावरच्या ३०० ते ३५० सभा या वर्षभरात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज यांच्या मराठवाडय़ाच्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच ठिकाणी गटबाजी दिसून आली. उस्मानाबादमध्ये कार्यकारिणीही बरखास्त केली. याबाबत ते म्हणाले की, काही नसलेली पदे दिसून आली. काहीजणांचे एमआयआर स्कॅन पूर्ण झाले आहे. त्याविषयी नंतर बोलेल. दुष्काळ व नगर येथे ताफ्यातील गाडीवरील दगडफेकीच्या अनुषंगाने, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘राडा’ बाबत सभेतच बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केले. टोलप्रश्नी मनसेने केलेल्या आंदोलनाचा पाठपुरावा अखेपर्यंत का झाला नाही असे विचारले असता ते म्हणाले की, या विषयी कोणीच काही बोलत नव्हते. आम्ही आंदोलन केल्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले. हे आंदोलनाचे यश नाही काय? यांना त्याच-त्याच ठेकेदारांना काम का द्यायचे असते? टोलवसुली सरकारमार्फत होऊ शकत नाही का? टोल देऊ नये, असे माझे मत नाही. मात्र, ज्या पद्धतीने ‘कॅश’ ने हा व्यवहार सुरू होता, त्याला मनसेच्या आंदोलनामुळे वचक बसला. यातील तांत्रिक बाबींची माहिती मुख्यमंत्र्यांनाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेपासून दलित आणि मुस्लिम समाज दूर असल्याची निरीक्षणे काहीजणांनी नोंदविली. त्याला राज ठाकरे यांनी उत्तर दिले. मुंबईच्या रमाबाई आंबेडकरनगरपासून मनसेचे नगरसेवक आहेत. नाशिकमध्येही अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सर्वजण मनसेबरोबर आहेत. गर्दी दिसते, पण ती मतांमध्ये परिवर्तित  होईल का, या प्रश्नातील परावर्तित हा शब्द उपहासाच्या अंगाने सांगत ते म्हणाले, १३ आमदार उगीच निवडून आले काय? गर्दी जमविता येते, पण त्यात उत्साह भाडय़ाने आणता येतो का? शिवसेनेबरोबर वादाचे कारण जर राजकारण असेल तर वैयक्तिक पातळीवर टीका कशाला करू? आतापर्यंत जे बोललो ती राजकीयच वक्तव्ये होती, असेही त्यांनी सांगितले.