अहमदनर जिल्ह्यातील जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियांच्या हत्याकांड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. या प्रकरणाची वेगाने चौकशी करावी, अशी मागणी राज यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.  
जवखेडा गावामध्ये संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांची हत्या करण्यात आली होती. यांच्या नातेवाईकांची राज ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली होती. जवखेडा हत्त्याकांड प्रकरणी कारवाईत पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा मुद्दाही ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. अशा प्रकरणात कारवाई केल्यास पोलिसांवरही अॅक्शन घेतली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कारवाईसाठी पोलिसांकडून चालढकल केली जाते. अशा वेळी पोलिसांचे मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या तिहेरी हत्याकांडातील आरोपींचा तपास करून लवकरात लवकर त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. आरोपींना वेळीच शासन झालं तर पुन्हा अशी कृती करण्याची हिंमत कोणी करणार नाही असे राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांशी घेतलेल्या भेटीत राज ठाकरे यांनी ऊसाला पहिला हप्ता २५०० रुपये, तर अंतिम दर तीन हजार रुपये द्या, अशी मागणी केली. महाराष्ट्राला पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्याची मागणी करत पर्यटनाबाबत आम्ही प्रेझेंटेशन सादर करू, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने अनेक कामे रखडली असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.