08 August 2020

News Flash

मंजूर प्रकल्प रद्द झाल्यास मंत्र्यांना फिरकू देणार नाही -नारायण राणे

राज्याला मुख्यमंत्री आहे. राज्यात सरकार आहे, असे वाटत नाही. कोकण विकासाच्या दृष्टीने पोरका झाला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर पडत आहे.

| June 26, 2015 03:21 am

राज्याला मुख्यमंत्री आहे. राज्यात सरकार आहे, असे वाटत नाही. कोकण विकासाच्या दृष्टीने पोरका झाला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर पडत आहे. भाजपातील एक गट त्यामागे आहे. कोकण विकासाचे मंजूर प्रकल्प रद्द झाल्यास कोकणात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा कॉँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिला.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. या वेळी आमदार नीलेश राणे, जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते.
मी विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय होत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासात कोणालाही रस नाही. फक्त राजकारण सुरू आहे. सी वर्ल्ड, विमानतळ, रेडी पोर्टसारखे प्रकल्प चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सी वर्ल्ड भूसंपादन प्रक्रिया थांबली आहे. विमानतळ हॅलिपॅड मर्यादित बदल करण्यात आले आहेत. आरोंदा जेटीसाठी रेडी पोर्टविरोधात तक्रारी सुरू आहेत, असा समाचार नारायण राणे यांनी घेतला.
मुख्यमंत्री सत्ताधाऱ्यांनी प्रकल्प रद्द केल्यास तरुणांना नोकऱ्या कुठे देणार ते सांगावे. जिल्ह्य़ाच्या विकासाचे कुणालाही प्रेम नाही. भ्रष्टाचार वाढला असून, अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीनंतर कोकण पोरका झाला आहे. पाटबंधारे प्रकल्पाची कामे ठप्प झाली आहेत. राज्याला उद्योगमंत्री आहेत, असे वाटत नाही. असा टोलाही राणे यांनी हाणला.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणावरून आणि महामार्ग चौपदरीकरणाबाबत सरकार उदासीन आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोकण रेल्वे ट्रकबाबत घोषणा करून धक्का दिला आहे. कोकण विकास महामंडळ डबघाईला आले असून, ते कार्यरतही नाही, पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांची रेल्वेची घोषणा हास्यास्पद आहे, असे राणे म्हणाले.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी व विद्यापीठ बोगस आहे. भाजपचा एक गट मुख्यमंत्रीपदाचे दावेदार विनोद तावडे, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, असे नारायण राणे म्हणाले. सावंतवाडीत टर्मिनल नव्हे तर अधिकच्या सुविधांच्या भूमिपूजन व शुभारंभाला मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्यात धमक असेल तर रेल्वे दुपदरीकरण भारतीय रेल्वेच्या माध्यमातून करावे, तसेच कोकणातील महामार्गाचे चौपदरीकरण लोकांना देशोधडीला लावून नको, तसेच महामार्गावर टोल वसुलीला आपला विरोध राहील. कोकणच्या विकासात दिशाभूल, फसवणूक थांबवा अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणाच्या तरी नादाला लागून डोळे काढण्याची भाषा करू नये, असा इशारा देतानाच एक जरी हात वर गेला तरी तो पुन्हा खाली येणार नाही असे म्हणाले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे बोलणे योग्य नाही. तेही काचेच्याच घरात राहतात हे ध्यानात ठेवावे, असे राणे म्हणाले. भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा देण्यापेक्षा मंत्र्यांनीच प्रथम द्यावा, असे राणे म्हणाले.
राणे-राज ठाकरे यांची कणकवलीत भेट
सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या कोकण दौरा सुरू असून, बुधवारी रात्री त्यांनी कॉंग्रेस नेते नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क केले जात आहेत. राणेंचे कट्टर विरोधक, मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकरही यावेळी उपस्थित नव्हते. यामुळे मनसेतही चलबिचल झाल्याचे समजते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात बांधण्यापेक्षा इतिहासाची साक्ष देणारे जलदुर्ग, गड, किल्ल्यांना नवसंजीवनी द्यावी, असे मत  ठाकरे यांनी मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 3:21 am

Web Title: raj thackeray met narayan rane in kankavli
Next Stories
1 भाजप मेळाव्यात पुन्हा कानपिचक्याच
2 अखेर त्या माशाचा दुर्दैवी मृत्यू
3 तुंबारी वाऱ्यामुळे पावसाला ब्रेक
Just Now!
X