राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सध्या नैसर्गिक आपत्तींशी लढत आहे. निसर्गाने केलेल्या विध्वंसामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. याचीच पाहणी करण्यासाठी प्रशासनासह अनेक राजकीय नेतेही आपत्तीग्रस्त भागात धाव घेत आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांना असे दौरे टाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी सहमत असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागातल्या दौऱ्यांबद्दल भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांबद्दल त्यांना विचारण्यात आलं. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मनसेच्या सैनिकांना मी आवाहन केल्यानंतर त्यांनीही गावागावात जाऊन मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं नुसतं तिथे जाऊन पाहण्यात काहीही अर्थ नाही, प्रत्येकापर्यंत मदत पोहचायला हवी. जेवढी मदत पोहचेल तेवढं चांगलं आहे.

हेही वाचा -“शरद पवारांशी सहमत, मात्र….,” दौरे न करण्याच्या सल्ल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागांमधले दौरे टाळण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं आहे. राजकीय नेते तिकडे गेल्यानंतर तिथली यंत्रणा दौऱ्यांच्या मागेच राहते. परिणामी बचाव आणि मदत कार्यावर परिणाम होतो, असं शरद पवार यांचं म्हणणं होतं. तर शरद पवार यांच्या म्हणण्याशी आपण सहमत आहोत. पण आम्ही विरोधी पक्षनेते असल्याने आमच्या मागे फारशी यंत्रणा नसते, त्यामुळे आम्ही दौऱा करणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.