22 July 2018

News Flash

भाजपचा विजय नोटाबंदीमुळे नव्हे तर जुन्या नोटांमुळे – राज ठाकरे

नगरपालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे

नगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून भाजपच्या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा विजय हा नोटा बंद केल्यामुळे नाही तर जुन्या नोटांमुळे झाला असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा दिमाखात फडकला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा ५२ ठिकाणी विजय झाला आहे. तर ३१ नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली आहे.  नगरपालिकांमध्ये भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मात करत आघाडी घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकींना भाजप आत्मविश्वासाने सामोरे जाईल. भाजपच्या या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा विजय नोटाबंदीमुळे नव्हे तर जुन्या नोटांमुळे झाला अशी खोचक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मनसेसाठी नगरपालिका निवडणूक फारसी आशादायी ठरलेली नाही. नगरपालिका निवडणुकीत मनसेला फक्त १२ जागांवर यश मिळाले आहे. खेड पालिकेवर मनसेचा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर मनसेचे वैभव खेडेकर विराजमान झाले आहेत.
एकीकडे मनसेची कामगिरी निराशाजनक ठरली तरी एमआयएमसारख्या पक्षाने मनसेपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमला ४० जागांवर विजय मिळाला असून बीडमध्ये एमआयएमचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत.

नगरपालिका निवडणुकीकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून बघितले जात होते. या निवडणुकीतील मनसेला फारसे यश मिळालेले नाही. मुंबई, ठाणे अशा विविध महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आगामी काळात निवडणूक होणार आहे. शहरी भागात मनसेला संधी जास्त असली तरी या निवडणुकीत आता मनसेसमोर शिवसेनेसोबतच भाजपचे आव्हान असेल हे या निवडणुकीतून दिसते. यापूर्वी राज ठाकरे यांनी नोटाबंदीवरुनही भाजप सरकारवर टीका केली होती. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेताना आवश्यक तयारी केली नव्हती. त्यामुळे हा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

First Published on November 28, 2016 11:05 pm

Web Title: raj thackeray reaction bjp victory in nagar parishad election