करोना व लॉकडाउनमुळे काळात चित्रपटगृहांना कुलूप लागल्यानं आता ओटीटी प्लॅटफॉर्म हेच मनोरंजनाची थिअटर बनले आहेत. मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अशी ओळख असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला आणि त्यांनाही सिनेमाचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. सिनेमा बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी पोस्ट ट्विट करून सिनेमा आणि कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलं.

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. राज ठाकरे यांनी घरीच हा सिनेमा बघितल्यानंतर पोस्ट ट्विट केली आहे.

“आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा जरी २०१८ ला रिलीज झाला होता, तरी माझा पहायचा राहुन गेला होता. पण बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही, त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण. भालजी पेंढारकर सोडले, तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा मला योग आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओके, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक!

सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. करोनोत्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि … नटांच्या, संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी या सिनेमाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.