दुष्काळ, पाणी आणि वीज भारनियमन यांचा संदर्भ घेत इंदापूर तालुक्यात शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अनुचित वक्तव्याचा समाचार घेताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याच प्रकारची भाषा वापरत पवारांवर जोरदार टीका केली. सिंचनासाठी उपोषण करणाऱ्यांची अश्लील भाषेत हेटाळणी करणाऱ्या अजित पवार यांना २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेकडून मत नव्हे तर मूत मिळेल, असा टोलाही राज यांनी हाणला.
येथे प्रथमच जाहीर सभा घेणारे राज हे काय बोलतील, कोणाला लक्ष्य करतील याविषयी प्रचंड उत्सुकता असल्याने सभेला विक्रमी गर्दी झाली होती. राज यांनी आपल्या भाषणात मराठीपासून परप्रांतीयांपर्यंत, दुष्काळापासून आरक्षणापर्यंत, इतिहासापासून सद्य:परिस्थितीपर्यंत अशा सर्वच मुद्दय़ांना स्पर्श केला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या भयावहतेचे उदाहरण म्हणून राज यांनी दुष्काळाला कंटाळून महाराष्ट्रातील मुली मुंबई व गोव्यासारख्या ठिकाणी शरीरविक्रयाचा व्यवसाय करीत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रातील सर्व भागांतील समस्या सारख्याच असून हे चित्र केवळ बदल घडविला तरच बदलू शकते आणि त्यासाठी मनसे हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेवर जाण्यासाठी आपणांस ९५ कोटी, तर नाथाभाऊ यांना ४० कोटी रुपयांचा खर्च आला होता, अशी कबुली खुद्द सुरेश जैन यांनी काही वर्षांपूर्वी नागपूर येथे आपणाकडे दिली होती. इतक्या वर्षांपासून जळगावमध्ये उद्योगधंदे नाहीत, केळीवर प्रक्रिया उद्योग नाहीत, रोजगार नाहीत, असे नमूद करीत राज यांनी स्थानिक प्रश्नही या वेळी मांडले.