महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात मागील काही काळापासून घडत असणाऱ्या घडामोडींवर एका फॉर्वडेड विनोदाचा संदर्भ देत मिश्कील पद्धतीने भाष्य केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका विनोदाचा संदर्भ देत आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

राज यांचा टोला…

सव्वा वर्षांपासून हे सरकार सत्तेत आहे. मागील दोन महिन्यामध्ये दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तर हे सरकार कामापेक्षा बदनामीमध्ये अडकून राहिलं आहे असं वाटतं का?, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज यांनी, “मला काल कोणीतरी एक चांगला विनोद पाठवला. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावरती राज्य आलंय?” असं म्हटलं. राज यांची ही प्रतिक्रिया ऐकून सर्व उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

लॉकडाउन पाळतील अशी अपेक्षा

सध्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध सर्वचजण नीट पाळतील अशी आपल्याला अपेक्षा आहे असं राज यांनी म्हटलं. आपण लॉकडाउनचे नियम पाळले नाही तर आपल्यालाच त्रास होईल याची जाणीव लोकांना आहे. आधीचा लॉकडाउन पोलीस आणि इतर यंत्रणांमुळे पाळला गेला. तसाच हा लॉकडाउनही पाळला जाईल अशी मला तरी खात्री आहे, असं राज यांनी म्हटलं.

वयोमर्यादा नसावी…

लसीसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी मला लसीसंदर्भातील तांत्रिक गोष्टी ठाऊक नसल्याचं सांगितलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी, मला तांत्रिक गोष्टी ठाऊक नसल्याने मी केंद्राने लसींना परवानगी का दिली किंवा दिली नाही हे मला ठाऊक नाही असं म्हटलं. मात्र लसीकरणाला वयोमर्यादा नसावी असं स्पष्ट मत राज यांनी यावेळी व्यक्त केलं. सध्या आरोग्य हा राज्य सरकारचा नाही देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आणि उद्या तिकडे असेल. त्यामुळेच राज्य सरकारांनी आणि केंद्राने आरोग्य या विषयासंदर्भात गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक गोष्टींसाठी काय तरतूद केली आहे यासंदर्भातही सरकारांनी आढावा घेणं गरजेचं असल्याचं मत राज यांनी व्यक्त केलं आहे.

…म्हणून मी घेतली पत्रकार परिषद : राज ठाकरे

“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

राज यांनी काय मागण्या केल्या?

“शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा,” अशा मागण्या केली असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.