राज ठाकरे यांच्याकडं फक्त ठाकरे आडनावाचं वलय आहे. हे आडनाव जर त्यांच्याकडं नसतं तर ते संगीतकार झाले असते, अशा शब्दांत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. नाशिक महापालिकेतील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

पाटील म्हणाले, “बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला. बाळासाहेब आणि शिवसेनेमुळे एक पानवाला आज कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला. मात्र, मनसे कुठे राहिली आहे. केवळ ठाकरे आडनावाचं राज ठाकरे यांच्याकडे वलय आहे हे आडनाव जर नसतं तर ते संगीतकार झाले असते,” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.

मनसेबरोबरच या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपावरही पाटील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, “भाजपा आमच्या जीवावर वाढली आणि आता ते आमच्यावरच टीका करीत आहेत. भाजपाला सत्तेसाठी पीडीपी, नितीशकुमार, रामविलास पासवान हे चालतात आणि आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर आमच्यावर ते टीका करतात.”

विधानसभा निवडणुकीत नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देत मनसेकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर (प्रभाग क्र. २६) पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी मनसे, भाजपा आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील निशिकमध्ये आले होते.