पंतप्रधान हा एखाद्या राज्याचा नसतो, तो संपूर्ण देशाचा असतो. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मोदींवर शरसंधान साधले. मात्र, मोदींना पाठिंबा देण्याबाबत थेट बोलण्याचे टाळत त्यांनी मनसेचे ‘कार्ड’ राखून ठेवले. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे दिल्लीत ‘आप’ने सत्ता हस्तगत केली. तथापि, महाराष्ट्रात मनसेच बाप राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे नरेंद्र मोदी यांना उमेदवारी देण्यात आल्यापासून याबाबत जाहीर वक्तव्य टाळणाऱ्या राज यांनी गुरुवारी प्रथमच या विषयावर आपली व पर्यायाने मनसेची भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नाशिक येथे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज म्हणाले, ‘पंतप्रधान हा एखाद्या राज्याचा नसतो तर तो संपूर्ण देशाचा असतो. त्याच्यासाठी देशातील सर्व राज्ये समान असली पाहिजेत.’ गुजरातमध्ये मोदी यांनी केलेल्या कामाचे मला कौतुक असले तरी मोदी नेहमी गुजरातबद्दलच बोलतात, अशी टीकाही राज यांनी केली. मोदी मुंबईत आले तरी गुजराती लोकांबद्दल बोलतात, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याबाबत बोलतात. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ते मौन बाळगतात,’ असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर मनसे मोदींना पाठिंबा देईल काय, या प्रश्नावर राज यांनी अद्याप त्यास बराच अवधी असल्याचे सांगून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली.
राज यांनी महायुतीवरही निशाणा साधला. ‘महायुतीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लोकसभेची एकच जागा आहे. जागावाटपावरून त्यांच्यात घोळ असून ही संघटना महायुतीत सहभागी झाल्यामुळे कोणताही फरक पडणार नाही,’ असे ते म्हणाले. आम आदमी पक्षाचा महाराष्ट्रात कोणताही प्रभाव पडणार नसून या ठिकाणी मनसेच बाप राहणार आहे. दिल्लीत काँग्रेसने काहीही कामे केली नाहीत. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागल्याचे राज यांनी नमूद केले. दरम्यान, दिवसभरात राज यांनी जिल्हानिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्या त्या मतदारसंघातील स्थिती जाणून घेतली. त्या ठिकाणी सक्षम उमेदवार कोण असू शकेल याची चाचपणी त्यांनी केली.