लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला नाहक त्रास होत असेल तर त्याच्या पाठिशी उभं राहण्यात गैर काय? असा प्रश्न विचारत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीमार्फत चौकशी होण्याबाबत उद्धव ठाकरे यांनीही एक भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना पाठिंबाच दिला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही राज ठाकरेंची ईडी चौकशी निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरे हे गुरुवारी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोहिनूर प्रकरणात राज ठाकरे यांची साडेआठ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झालेले राज ठाकरे हे रात्री आठच्या सुमारास बाहेर आले. राज ठाकरे यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केलं अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांन दिली. दरम्यान त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत गेले होते. आता दिवाकर रावते यांनीही राज ठाकरे यांची ईडी चौकशी निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान एसटी महामंडळाच्या महिला वाहक आणि चालक भरतीबाबत विचारले असता, एस.टी. महामंडळाने १६३ महिलांची निवड केली असून १४२ महिलांना वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटले. तसेच येत्या १० ते १२ वर्षात एस.टी.मध्ये सुमारे दहा हजार महिला चालक असतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या ४०० शिवशाही बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत असेही त्यांनी सांगितले.