महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच त्यांचे पूत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणामध्ये उतरवणार असल्याचे समजते. अमित ठाकरे हे अनेकदा राज यांच्याबरोबर दौऱ्यांवर तसेच विधानसभा निवडणुकींच्या प्रचारसभांमध्ये दिसले होते. अमित यांच्याकडे अद्याप पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. मात्र आता २३ जानेवारी रोजी होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशानामध्ये अमित ठाकरेंबद्दल मोठी घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे चर्चा?

मिळालेल्या माहितीनुसार २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. अनेकदा राज यांच्याबरोबर दिसणाऱ्या अमित यांच्यावर औपचारिकरित्या पक्षासंदर्भातील काही जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे समजते.

अमित ठाकरेंचा पहिला मोर्चा

राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्याच दिवशी अमित यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं होतं. नवी मुंबईतील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामकागारांना त्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ सिवूडस रेल्वे स्टेशन (पश्चिम) ब्रिज पासून महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अमित ठाकरे सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगर पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणी पुरवठा अश्या १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी एकूण ९० कोटी रुपये तसेच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला.

आंदोलनाला यश आल्याची माहिती

अमित यांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याचं पक्षानं सांगितलं होतं. या आंदोलनानंतर तीन आठवड्यात थकीत वेतन देण्याचं आश्वासन मनसेला देण्यात आलं आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतही कंत्राटदाराला निर्देश देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली होती.

राज चर्चेत नाही…

राज्यामध्ये विधानसभा निडवणुकींचे निकाल लागल्यानंतर रंगलेल्या सत्तानाट्यामध्ये राज ठाकरे प्रामुख्याने कुठेच दिसले नाही. १०० जागांवर निवडणूक लढवणाऱ्या मनसेला केवळ एक जागा जिंकता आली. त्यानंतरही राज ठाकरे ठामपणे कुठलीच भूमिका मांडताना दिसले नाहीत. त्यामुळे आता अमित यांच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याचे समजते.

राज-फडणवीस भेट

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलं होतं. पालघरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन ठिकाणी भाजपा-मनसे युतीने यश मिळवल्यानंतर मनसे भाजपासोबत जाणार का अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.

झेंडाही बदलणार?

मनसेचा झेंड्याचा रंग बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते. पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.

हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार?

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays son amit thackeray to enter into active politics scsg
First published on: 09-01-2020 at 17:28 IST