व्यंगचित्र काढण्यासाठी विनोदबुद्धी, स्केचिंग, निरीक्षण आणि राजकीय जाण हे गुण तर असायलाच हवेत. पण, त्याचबरोबरीने व्यंगचित्रकार हा आधी नकलाकार असायला हवा.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या टिप्पणीला चित्ररेषांच्या भाषेतच उत्तर दिले. इतके विषय असतात की, रोज सकाळी हात शिवशिवतो. व्यंगचित्र छापण्यासाठी स्वतचे वर्तमानपत्र काढावे असे वाटते. पण, एवढय़ात नाही, असेही ते म्हणाले.
सरस्वती लायब्ररी आणि कार्टूनिस्ट कम्बाईन यांच्यातर्फे आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्र संमेलनाचे उद्घाटन राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र चितारून केले. तर, संमेलनाध्यक्ष आर. के. लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’ रेखाटत आपल्या बोटातील जादू अजूनही कायम असल्याची प्रचिती दिली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, कमला लक्ष्मण, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, कृष्णकांत ??कुदळे आणि संयोजक कैलास भिंगारे याप्रसंगी उपस्थित होते.  
बाळासाहेब, श्रीकांत ठाकरे आणि आर. के. यांची चित्रे पाहतच वाढलो. आरकेंची चित्रे दाखविताना बाळासाहेब त्यातील बारीक तपशील समजून सांगायचे. ब्रश आणि शाईने काम करण्याची सवयही त्यांनी लावली. हात तयार झाला पाहिजे यासाठीचा त्यांचा आग्रह असायचा, अशा शब्दांत बाळासाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्र ही शेवटची कला आहे. त्यासाठी आधी चित्रकला जमायला हवी. कॉलेजमध्ये असताना दिवसाला अकरा तास स्केचिंग करायचो. समोर जे दिसेल त्याचे चित्र काढायचो. मग, तो दिव्याचा खांब असेल किंवा कचराकुंडी. परंतु या अभ्यासाचा पुढे उपयोग झाला. आपल्याकडे विषयांचा तुटवडा नाही. वर्तमानपत्र वाचल्यावर रोज नवीन काही सुचते. व्यंगचित्र काढण्यासाठी हात शिवशिवतो. पण. काढून छापणार कुठे हा प्रश्न असल्यामुळे आता ही कला माझ्यापुरतीच राहिली आहे. चित्र काढत नसल्यामुळे मग त्या गोष्टी थोबाडातून बाहेर पडतात. त्यानंतर केसेस होतात. व्यंगचित्रकार हा नकलाकार असायला हवा, त्याशिवाय ते जमत नाही.
मात्र, भाषण करताना नकलाच कराव्या लागतात. तेथे चित्र काढू शकत नाही. त्यामुळे नकला करतो म्हणून त्यांनी बोलणे स्वतहून बंद केले. त्याला माझा नाईलाज आहे.
याप्रसंगी कमला लक्ष्मण यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
उद्घाटनानंतर राज ठाकरे यांनी बालगंधर्व कलादालनामध्ये जाऊन व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्याचा आनंद लुटला.
माझे काम सोपे- राज ठाकरे
शि. द. फडणीस म्हणाले, राजकारण आणि कला यांचे मिश्रण ठाकरे कुटुंबामध्ये आहे. राज ठाकरे यांच्या हृदयातील एक कप्पा व्यंगचित्रांसाठी राखून ठेवलेला असतो. आज त्यांना आम्ही राजकीय नेते म्हणून नव्हे व्यंगचित्रकार म्हणूनच निमंत्रित केले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले, खूप दिवसांनी पाहतोय भांडणाविना संमेलन होत आहे. फडणीस सरांनी माझे काम सोपे केले. त्यामुळे बाकीच्या विषयांवरचे भाषण आज होणार नाही.