बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आनंद साजरा करण्यासाठी मिठाई वाटण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. वाचा काय म्हणाले राज ठाकरे….

राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेनेही महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. दरम्यान राम मंदिराच्या निर्माणासाठी रथयात्रा काढणारे भाजपाचे महत्वपूर्ण नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे मी माझं भाग्य समजतो. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे असं लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटलं आहे.