सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांबाबत बोलावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव काय? ही बाब अत्यंत गंभीर आहे. न्यायव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप किती वाढला आहे हेच यावरून स्पष्ट होते. आपल्या देशाची वाटचाल अराजकतेच्या दिशेने सुरु आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच न्यायाधीशांनाच जर हे प्रश्न उपस्थित करावेसे वाटत असतील तर आपण न्याय मागायचा कोणाकडे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.

नाणार प्रकल्पग्रस्तांसोबतच्या बैठकीसाठी राज ठाकरे रत्नागिरीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात जर अशी स्थिती असेल तर देश कुठे चालला आहे असा प्रश्न पडतोच. शिवाय मुख्य न्यायाधीशांच्या विरोधात बोलणाऱ्या न्यायाधीशांचा काय कोंडमारा झाला असेल हे सांगणे खरोखर कठीण आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. हा वाद इतक्यात मिटेल असे वाटत नाही हा वाद सुरूच राहणार असेही राज ठाकरेंनी सांगितले. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये दंगली घडवल्या जातील असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. न्याय प्रक्रियेची वाट लागली आहे. निवडणूक आयोग कामातून गेला आहे हे गुजरात निवडणूक निकालांवरून लक्षात आलेच असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

पर्यावरणाचे रक्षण गरजेचे

नाणार तेलशुध्दीकरण प्रकल्पाबाबत आपण संबंधित लोकांना भेटल्यानंतरच भूमिका मांडू, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. या संदर्भात पूर्वी बोलताना, जमिनी विकू नका, असे मी वारंवार सांगितले होते. पण अनेकांनी जमिनी दिल्या. येथे प्रकल्पांना विरोध होतो आणि कालांतराने मावळतो, असा अनुभव आहे.त्यामुळे कोकणी माणसाला हाताळणे सरकारला सोपे झाले आहे.अणुउर्जा प्रकल्पाचे झाले तेच येथे घडू नये. पर्यावरणाचाही विचार झाला पाहिजे, असे मत ठाकरे यांनी नोंदवले.

पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजातील अनियमितता आणि सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाचे  वरिष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि खळबळ उडवून दिली. त्याच सगळ्या पत्रकार परिषदेबाबत राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया देत देशाची वाटचाल अराजकतेकडे होते आहे असे म्हटले आहे.