शहरात सिंहस्थांतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी भाजपने टाकलेल्या बहिष्कारामुळे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय घाईघाईने उकरण्याची नामुष्की मनसेवर ओढावली. जवळपास २७ कामांचे भूमीपूजन अवघ्या दोन तासात करताना राज यांनी भाजपच्या बहिष्काराच्या मुद्यावर मौन बाळगणे पसंत केले. या कार्यक्रमावेळी राज यांच्या मोटारीमागे मनसे पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा भलामोठा ताफा असल्याने शहरातील अनेक भाग वाहतूक कोंडीत सापडले.
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधल्यामुळे नाशिक महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसे व भाजप आघाडीत मतभेद निर्माण झाले. त्याची परिणती भाजपने या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात झाली. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे मन वळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यांना अपयश आल्याचे शनिवारी पहावयास मिळाले. राज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे भाजपचा एकही नगरसेवक वा पदाधिकारी फिरकला नाही. त्यांच्या अनुपस्थित मनसेला हा कार्यक्रम पार पाडणे भाग पडले. तासाभराच्या विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या मोटारीमागे मनसेचे आमदार, महापौर, नगरसेवक व पदाधिकारी यांच्या वाहनांची लांबलचक रांग होती. परिणामी, हा ताफा ज्या ज्या मार्गावरुन मार्गस्थ झाला, तेथील वाहतुकीचा बोजबारा उडाला. अशोकस्तंभ चौकातील कार्यक्रमाने तर मध्यवर्ती रस्त्यांवरील वाहतूक कोलमडून पडली. महापालिका आयुक्त, ज्येष्ठ नागरीक यांच्या हस्ते कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
भाजपने बहिष्कार टाकताना राज ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी भूमिका कायम राहिल्यास महापालिकेत एकत्रित रहायचे की नाही याचाही फेरविचार करण्याचा इशारा दिला आहे. कार्यक्रमात ते या मुद्यावर काहीतरी बोलतील अशी खुद्द मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु, संपूर्ण दौऱ्यात राज यांची ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी अवस्था होती.
सत्ताधारी भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या विरोधी पक्षातील कोणी नगरसेवक वा पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर दुपारी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.