उमेश शेटय़ेंच्या राजकीय मनसुब्यांना धक्का
रत्नागिरी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राजन शेटय़े यांनी माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े यांचे चिरंजीव केतन यांचा दणदणीत पराभव केल्यामुळे त्यांच्या राजकीय मनसुब्यांना धक्का बसला आहे.
काही महिन्यांपूर्वी उमेश शेटय़े यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे ते निवडून आलेल्या प्रभाग २ मधील रिकाम्या झालेल्या जागेसाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये सुमारे ५० टक्के मतदान नोंदवण्यात आले. या निवडणुकीच्या सोमवारी झालेल्या मतमोजणीत राजन शेटय़े यांनी १८१३ मत मिळवत केतन शेटय़े यांचा ६२५ मतांनी पराभव केला. या तिरंगी लढतीतील तिसरे उमेदवार भाजपचे उमेश कुलकर्णी यांना अपेक्षेनुसार तिसऱ्या क्रमांकाची ९५४ मते पडली. निवडणुकीतील मतदानाची कमी टक्केवारी लक्षात घेता राजन शेटय़े यांनी मिळवलेली विजयी आघाडी लक्षणीय मानली जाते. नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक या वर्षअखेरीस होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्याच्या कारकीर्दीला फारसा कालावधी मिळणार नाही. पण शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची झाली होती.
शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत आणि उमेश शेटय़े यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. त्यामुळेच सामंत यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच उमेश शेटय़े शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. मात्र त्यांच्या पत्नी उज्वला शेटय़े आजही तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेच्या नगर परिषद सदस्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उमेश शेटय़े यांनी गेल्या नोव्हेंबरात नगर परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये स्वत:सह सूनबाई कौसल्या शेटय़े यांचे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीच्या वतीने भरले. त्यामध्ये शेटय़े विजयी झाले, पण सूनबाईंना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना शेटय़े यांनी स्वत:च्या हक्काची जागा असलेला प्रभाग २ मधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेटय़े यांनी चिरंजीव केतन यांना उमेदवारी मिळवून दिली, तर नगर परिषदेच्या राजकारणातील त्यांचे एकेकाळचे विश्वासू राजकीय सहकारी राजन शेटय़े यांना शेवटच्या क्षणी शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळाली. अर्थात प्रत्यक्षात ही राजकीय लढाई उमेश शेटय़े आणि सेनेचे आमदार सामंत यांच्यात होती. सेनेचे अन्य आमदार राजन साळवी यांचीही साथ मिळाल्यामुळे सामंतांनी राजन शेटय़े यांच्यामागे मोठी ताकद उभी केली आणि केतन शेटय़े यांचा पराभव करत उमेश शेटय़ेंच्या भावी राजकीय मनसुब्यांना जोरदार धक्का दिला.
मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये असलेले आमदार सामंत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत गेल्यानंतर तेथे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याच्या हेतूने उमेश शेटय़े यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व शेटय़े यांचे एकेकाळचे राजकीय गुरू मानले जाणारे माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शेटय़े यांना पक्षाच्या शहर शाखेच्या कारभारात मोकळे रान दिले.
लाभ उठवण्याचा प्रयत्न करत मागील पोटनिवडणुकीत सूनबाई, तर या निवडणुकीत चिरंजीवांना उभे करून पक्षाच्या शहर शाखेवर कुटुंबाची पकड निर्माण करण्याचा उमेश शेटय़े यांचा मनसुबा होता. त्यांचे चिरंजीव केतन यांना नुकतेच राष्ट्रवादीच्या शहर शाखेचे अध्यक्षपदही देण्यात आले होते. मात्र मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अतिशय कमी झाली असल्यामुळे आणि सेनेच्या दोन्ही आमदारांनी ताकद एकवटल्यामुळे शेटय़े यांचे मनसुबे तूर्त तरी फसले आहेत.