राजापूर नगर परिषद

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्याने नगर पालिकेत त्रिशंकू स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये विषय समित्यांची निवड न करता त्या रद्द करण्याच्या खेळीचा काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारत विरोधकांना चांगलाच शह दिला. त्यानंतर, गठित करण्यात आलेल्या स्थायी समितीवरही काँग्रेसने अप्रत्यक्षरीत्या बाजी मारली. या घडामोडीमध्ये प्रत्येकी एक सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांचा स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश झाला.

विषय समित्यांसह स्थायी समिती गठित करण्यासाठी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपालिकेची बैठक पार पडली. यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये विषय समित्या गठित करण्यासंबंधीची प्रक्रिया पार पडली. सतरा सदस्य संख्या असलेल्या नगर पालिकेमध्ये काँग्रेसचे सात, शिवसेना आठ तर, राष्ट्रवादी आणि भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे विषय समिती आणि त्यांचे सभापती निवड करताना चांगलीच चुरस होण्याची शक्यता होती. वेळप्रसंगी या निवडणुकांचा निकाल चिठ्ठीद्वारे लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती.

या साऱ्या स्थितीमध्ये सभेच्या सुरुवातीला काँग्रेसचे गटनेते जमीर खलिफे यांनी विषय समित्या न निवडता केवळ स्थायी समिती निवडण्याचा ठराव मांडून नवी खेळी खेळली. त्यांच्या मागणीला हनिफ काझी यांनी अनुमोदन दिले.

सत्ताधाऱ्यांच्या या अचानक आलेल्या गुगलीने विरोधकांनाही फारसा विचार करण्याची संधी मिळाली नाही. शिवसेनेचे गटनेते विनय गुरव यांनी विषय समित्यांसह स्थायी समिती निवड करण्याची उपसूचना मांडली. त्याला शुभांगी सोलगावकर यांनी अनुमोदन दिले. त्यावर सभागृहामध्ये मतदान घेतले असता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एका बाजूला तर, शिवसेना आणि भाजपाने एका बाजूला मतदान केले. त्यामध्ये समसमान मतदान झाल्याने निर्णय चिठ्ठीच्या कौलावर गेला. त्यामध्ये चिठ्ठीचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागला आणि नगर पालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच विषय समित्या न निवडण्याचा निर्णय झाला. विषय समित्या रद्द झाल्याने सायंकाळच्या सत्रामध्ये झालेल्या स्थायी समिती निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या बैठकीत स्थायी समिती गठित करण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नगरसेवकांच्या तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीची पाच इतकी सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार स्थायी समिती गठित करण्यासंबंधित सायंकाळच्या सत्रामध्ये बैठक पार पडली.

या समितीमध्ये तौलनिकदृष्टय़ा जास्त सदस्य संख्या असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि भाजपचा होऊन एक-एक सदस्य संख्या असलेल्या या दोन्ही पक्षांच्या या नगरसेवकांचा समावेश झाला.

यावेळी निवडण्यात आलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष हनिफ काझी हे अध्यक्ष राहणार असून सदस्यपदी संजय ओगले (राष्ट्रवादी), स्नेहा कुवेस्कर (काँग्रेस), प्रतीक्षा खडपे, शुभांगी सोलगावकर (दोन्ही शिवसेना), गोविंद चव्हाण (भाजप) यांचा समावेश झाला आहे.