सुहास सरदेशमुख

एका बाजूला मराठवाडय़ातून स्थलांतराला सुरुवात झालेली असताना विहिरींच्या कामासाठी औरंगाबाद जालना जिल्हय़ात राजस्थान व मध्य प्रदेशातील मजूर आले आहेत. रोहयोच्या विहिरींवर काम करण्यासाठी आलेले हे मजूर प्रतिदिन ३५० रुपये घेतात. मराठवाडय़ात ४९ हजार विहिरी खणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरविले होते. त्यातील अनेक विहिरींची कामे होणे बाकी आहे. एक लाख ९० हजार रुपयांमध्ये विहिरींचे काम करण्यासाठी खास राजस्थानहून आणि मध्य प्रदेशातून मजूर आले आहेत. वैजापूर व गंगापूर तालुक्यात पूर्वी कापूस वेचण्यासाठी मध्य प्रदेशातून मजूर येत. मात्र, या वर्षी कापसाचे उत्पन्न कमी असल्याने हे मजूर आता विहीर खणण्याच्या कामात गुंतले आहेत.

औरंगाबाद व गंगापूर तालुक्यांत कोणत्याही रस्त्यावरून जाताना प्रत्येक शेतात दगडांचा खच पडलेला दिसतो. मोठय़ा प्रमाणात विहिरी खणण्याचे काम सध्या सुरू आहे. या विहिरींना फारसे पाणी लागत नाही. काळा पाषाण लागतो पण पाणी काही दिसत नाही, असे चित्र दिसून येत आहे. राजस्थानहून रामलाल गुजर मजुरांसह गंगापूर तालुक्यात दीड महिन्यांपूर्वी आले. दीपावलीमध्ये यायचे आणि होळीला जायचे, असे त्यांचे ठरलेले असते. ६० फूट खोल आणि १६ फूट रुंद विहीर खणण्यासाठी त्यांची स्वत:ची क्रेन आहे. यापेक्षा अधिक खोल विहीर खणायची असेल तर प्रत्येक फुटास अधिकचे साडेचार हजार रुपये, असे आर्थिक गणित ठरलेले आहे. वरखेड या गंगापूर तालुक्यातील साईनाथ उत्तम नरोटे सांगत होते, ‘दहा एकर शेतीमध्ये या वर्षी उत्पन्न तसे मिळाले नाहीच. सहा एकरांत केवळ २० क्िंवटल कापूस झाला. त्यांना अपेक्षा होती १२५ क्विंटलची. मका पीकही हाती लागले नाही. त्यामुळे ते वैतागले. विहिरी खणण्याच्या कामात अधिक पैसा दिसत असल्याने त्यांनी एक क्रेन विकत घेतली. एका गोलाकार लोखंडी चक्रावर क्रेन बसवून त्याच्या साहाय्याने लोखंडी टोपल्यातून दगड विहिरीतून बाहेर आणले जातात. हे काम करण्यास राज्यातील मजूर तसे फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानातून आलेल्या मजुरांच्या मदतीने हे काम केले जाते.’

७५ हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या क्रेन आणि दगड फोडण्यासाठी लागणाऱ्या जिलेटीनचे परवाने मिळविले जातात आणि आता बोअर ऐवजी विहिरी खणल्या जात आहेत. उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्हय़ांमध्ये विंधनविहिरी घेण्याचे प्रमाण अधिक आहे. तर औरंगाबाद व जालना जिल्हय़ात विहिरी अधिक प्रमाणात घेतल्या जातात.

मध्य प्रदेशातून नारायण चौहान आणि त्याचा मित्र सुनील दोघे जण मराठवाडय़ात दुष्काळी काम करण्यासाठी परिवारासह आले आहेत. जेथे विहिरीचे काम सुरू असते त्या भागातच ते पाल ठोकतात. त्यांना मध्य प्रदेशात पुरेसे काम मिळत नाही. दिवसाला फार तर शंभर रुपये हजेरी मिळते. त्या मानाने महाराष्ट्रातील रोजगार परवडतो, असे तो सांगत होता. मध्य प्रदेशातून सहा जोडय़ा एका विहिरीच्या कामावर आल्या आहेत. गावोगावी आता राजस्थान व मध्य प्रदेशातून आलेले मजूर दिसतात. त्यांनी त्याचे व्हिजिटिंग कार्डसुद्धा बनवून घेतले आहेत. ज्या शेतकऱ्याला विहीर खणायची आहे, त्यांना संपर्कासाठी बरे पडते असे राजस्थानहून आलेले रामलाल गुजर सांगत होते. आता या भागात परराज्यातील मजूरच असल्याचा दावाही ते करतात. एवढे अवघड काम आमच्याकडची मंडळीच करतात असेही ते सांगतात. एका बाजूला विहिरीच्या कामाबरोबरच विंधन विहिरीचे कामही वाढू लागले आहे. मुद्देशवाढगाव येथे गेल्या महिन्याभरापासून बोअर पाडणारी गाडी मुक्कामी आहे. कोठून तरी पाणी मिळावे आणि किमान फळबाग जगावी यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी प्रयत्न करीत आहे. या शेतकऱ्यांना मदत होईल अशी योजना आघाडी सरकारच्या काळात सुरू होती. ३० हजार रुपयांचे अनुदान फळबागा वाचविण्यासाठी देण्यात आले होते. हे अनुदान या सरकारच्या काळात मिळत नसल्याचीही तक्रार शेतकरी करीत आहेत.