गडचिरोलीचे पालकमंत्री आत्राम यांच्या वर्तनामुळे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ

गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात बुधवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान सुरेश तेलामी यांना गुरुवारी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजे अंबरिश आत्राम यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात येणार होती; मात्र एका विवाहसोहळ्यातील पाहुणचार घेण्यात गुंतलेले आत्राम हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तास उशिरा गडचिरोलीत पोहोचल्याने तेलामी यांच्यावरील अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ आली. आत्राम यांच्या या वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

शहीद जवान सुरेश लिंगा तेलामी यांना गडचिरोलीतील पोलीस मैदानात दुपारी दीड वाजता अखेरची मानवंदना व सलामी देण्यात येणार होती. गडचिरोलीत अशा प्रसंगी पालकमंत्री उपस्थित राहण्याची प्रथा आहे. त्यामुळे पालकमंत्री राजे अंबरिश आत्राम यांना पोलिसांनी सकाळीच त्याबाबतची कल्पना दिली होती. मानवंदना झाल्यानंतर सुरेश यांचे पार्थिव न्यायचे असल्याने तेलामी कुटुंबीयसुद्धा गडचिरोलीत वेळेत पोहोचले होते. सुरेश यांचा केवळ १५ महिन्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. पालकमंत्र्यांनी दीडच्या सुमारास गडचिरोलीत दाखल होणे आवश्यक होते, मात्र ते वेळेवर आलेच नाही. पोलीस मैदानात सगळे त्यांची वाट बघत असताना आत्राम हे अहेरी येथे त्यांच्या एका कार्यकर्त्यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात पाहुणचार घेण्यात गुंतले होते. हा विवाह उशिरा लागल्याने पालकमंत्री तब्बल पाच तासांनी म्हणजे सायंकाळी सहाच्या सुमारास गडचिरोलीत पोहोचले. तोवर मानवंदनेसाठी जमलेले सारे वरिष्ठ अधिकारी, पोलीस दलातील जवान व शहीद सुरेश यांचे कुटुंबीय प्रचंड उकाडय़ात ताटकळत राहिले. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम हे देखील आले होते. त्यांनाही मंत्र्यांच्या या उशिरा येण्याचा फटका सहन करावा लागला. पालकमंत्री आल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरेश यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. मानवंदना दीड वाजताच ठेवण्यात आली होती व त्याची स्पष्ट कल्पना मंत्र्यांना देण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

विलंबामुळे पार्थिव नेणे अशक्य

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरेश तेलामी यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी नेण्यात येणार होते. हे गाव कृष्णार भामरागडपासून बरेच आत असल्याने पोलिसांनी व्यवस्था केली होती. मात्र अखेरची मानवंदनाच उशिरा झाल्याने पार्थिव लगेच गावी नेणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे गुरुवारी होणारे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ तेलामी कुटुंबीयांवर आली. या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात आत्राम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.