कोळसा खाण घोटाळ्यात अडकलेले राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी एल्गार पुकारलेला असताना विदर्भातील भाजप नेते मात्र या प्रकरणावर मौन बाळगून आहेत. हा घोटाळा उघडकीस आणणारे पक्षाचे खासदार हंसराज अहिर यांनीही सोमवारी या विषयावर बोलायचे टाळले. त्यामुळे या मौनाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्र सरकारकडून कोळसा खाण मिळवताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हापासून राजेंद्र दर्डा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवरून सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. सीबीआयच्या पथकांनी गेल्या ४ सप्टेंबरला दर्डा कुटुंबीयांच्या घरांवर, तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापे टाकले व सायंकाळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिक्षक दिनाच्या आदल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने या दिनाच्या दिवशी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची अवस्था बिकट झाली होती. या दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दर्डाविरुद्ध भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.
दर्डा यांनी या खाणी मिळवताना गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईत केला. सोमय्या यांनीच दर्डा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नंतर या पक्षाचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनीही जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन दर्डाच्या राजीनाम्याची मागणी केली. अन्यथा पक्षातर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही खडसे यांनी गेल्याच आठवडय़ात बोलताना दिला होता.
दर्डा प्रकरणावरून राज्यातील आघाडी सरकार अडचणीत आले असताना व विरोधी पक्ष या नात्याने भाजपच्या नेत्यांना सरकारला अडचणीत आणण्याची चांगली संधी असतानासुद्धा विदर्भातील भाजप नेते मात्र दर्डा प्रकरणावर मौन बाळगून आहेत. याच कोळसा खाण प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांनी गेले १३ दिवस संसदेचे कामकाज ठप्प पाडले होते. यानंतर या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरतानाच आता हा मुद्दा जनतेच्या दरबारात नेऊ, असे जाहीर केले. त्यासाठी पक्षाने देशव्यापी जाहीर सभा घेण्याचा कार्यक्रमसुद्धा जाहीर केला.
या पाश्र्वभूमीवर या पक्षाच्या विदर्भातील नेत्यांनी दर्डा प्रकरणावर बाळगलेले मौन अनेकांना कोडय़ात टाकणारे आहे. तीन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अमरावतीत येऊन गेले. ते मुंबईला परत जाताच भाजपचे अभ्यासू आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रपरिषद घेतली. चव्हाण यांच्याविरुद्ध एवढी तत्परता दाखवणारे भाजपचे नेते दर्डा प्रकरणावर का बोलत नाहीत, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
कोळसा खाणींचा हा घोटाळा उघडकीस आणणारे खासदार हंसराज अहिरसुद्धा भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी या प्रकरणात चांगली कामगिरी केली म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी नुकतीच त्यांची पाठ थोपटली. मात्र सोमवारी येथील पत्रकार परिषदेत अहिर यांनीसुद्धा दर्डा प्रकरणावर बोलायचे टाळले. यासंबंधीचा प्रश्न वारंवार विचारण्यात आला असता अहिर यांनी कुणा एका व्यक्तीच्या राजीनाम्याचा हा विषय नाही, असे वक्तव्य करून त्यांनी दर्डा यांचे नाव घेणेसुद्धा टाळले. पक्षाने थेट पंतप्रधानांचाच राजीनामा मागितलेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीविरुद्ध बोलणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी दर्डावर केलेल्या आरोपाविषयी छेडले असता अहिर यांनी ती सोमय्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, असे सांगून या प्रश्नाची बोळवण केली. या घटनाक्रमांमुळे भाजपचे विदर्भातील नेते दर्डा प्रकरणावर बोलायला तयार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दर्डा हे माध्यमसम्राट असल्यामुळे तर भाजप नेत्यांनी हे मौन बाळगले नाही ना, अशी शंका आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप