नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान यांनी सलग ३६ तास म्हणजेच अथकपणे बारा वेळा ‘खैंदुळ’ हा एकपात्री नाट्यप्रयोग केला. ‘लेक वाचवा’ हा संदेश देणाऱ्या या प्रयोगाची नोंद ‘महाराष्ट्र बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये करण्यात आली. यावेळी सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन प्रधान यांचा गौरव करण्यात आला.

जयसिंगपूर नगरपरिषद व कलाविश्व रंगभूमी संस्थेच्यावतीने जयसिंगपूर शहराच्या शतकोत्तर वर्षानिमित्त येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे हा नाट्यविष्कार रंगला. यावेळी राजेंद्र प्रधान यांनी ३६ तासांचा ‘खैंदुळ’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. हा विक्रम ‘लेक वाचवा अभियाना’ला समर्पित करण्यात आला. यावेळी प्रधान यांचा सत्कारदेखील करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री प्राची गोडबोले उपस्थित होत्या. ‘कलेची साधना केल्याशिवाय यश मिळत नाही. राजेंद्र प्रधान यांच्या खैंदुळाने लेक वाचवा अभियानाचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम केले आहे,’ असे प्राची गोडबोले यांनी यावेळी बोलताना म्हटले.

सलग ३६ तास राजेंद्र प्रधान हे अभिनय, संवादफेक, नाट्य रसिकांचा प्रतिसाद यात गुंतले होते. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा झाली. हा प्रसंग अनुभवताना प्रधान भारावून गेले. प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव करुन दाद देताच कलाकार प्रधान यांनी थेट रंगमंचावर माथा टेकून रसिकांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्या मातोश्री यांच्यासह प्रधान परिवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.