बार्शीत सेनेचे अस्तित्वच धोक्यात

सोलापूर जिल्ह्य़ात बस्तान बसविण्यासाठी भाजपाने इतर पक्षांतील नेते मंडळींना खेचत कमळ फुलविण्याचा जोरदार प्रयत्न हाती घेतला आहे. या प्रयत्नात बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे भाजपाच्या गळाला लागले असून त्यांनी शिवसेनेशी काडीमोड घेत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांच्याबरोबर बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष व तब्बल ३२ नगरसेवकासह तालुका पंचायत समितीचे सभापती व सदस्यही भाजपामध्ये जाणार आहेत. राऊत यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

गुरुवारी दुपारी राऊत यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शिवसेनेला दूर करून भाजपामध्ये जाण्याच्या निर्णयावर एकमत झाले. राऊत यांच्यासोबत बार्शीचे नगराध्यक्ष अ‍ॅड. आसीफ तांबोळी व ३२ नगरसेवक तसेच ५ जिल्हा परिषद, तालुका पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण संकपाळ व पंचायत समितीचे ७ सदस्यांसह शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब गायकवाड व इतर हजारो शिवसैनिकांचा संपूर्ण लवाजमा भाजपामध्ये दाखल होणार आहे. भाजपा पक्षप्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे स्वत: राजेंद्र राऊत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बार्शी शहरप्रमुख दीपक आंधळकर यांनी गेल्या महिन्यातच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. ते अद्यापि अन्य कोणत्याही पक्षात गेले नाहीत.

राजेंद्र राऊत यांच्या भाजपाप्रवेशामुळे बार्शीसह संपूर्ण जिल्ह्य़ात शिवसेनेला हादरा बसला आहे. बार्शी शहर व तालुक्यात तर शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राऊत यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी बार्शीचे प्रलंबित विकास प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला होता. त्यानुसार राऊत यांनी निर्णय घेऊन शिवसेनेत खळबळ माजविली. या निर्णयाविषयीची भूमिका विशद करताना राऊत म्हणाले, शिवसेनेत आपला कोंडमारा होत होता. बार्शी शहर व तालुक्यात सत्ता असूनही मंत्रालयात विकास कामे मार्गी लागत नव्हती. शिवसेनेच्या मंत्र्यांना त्याचे कसलेही सोयरसुतक नव्हते. हा अन्याय सहन करणे कठीण वाटत असतानाच भाजपाने विकासासाठी शब्द दिल्यामुळे आपण शिवसेना सोडून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. राजेंद्र राऊत हे कडवे शिवसैनिक होते. बार्शीतील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्या विरोधात त्यांचा सातत्याने संघर्ष चालू आहे. बार्शीचे राजकारणच मुळातच व्यक्तिकेंद्रित चालते. १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने राऊत यांना बार्शीतून विधानसभेची उमेदवारी दिली. पुढे २००४ साली दुसऱ्यांदा लढताता ते आमदार झाले. परंतु नंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राऊत हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर २००९ साली विधानसभा लढविली. मात्र मागील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी बदलते राजकीय हवामान लक्षात घेऊन राऊत यांनी काँग्रेस सोडली व पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सेनेच्या तिकिटावर त्यांनी मागील विधानसभेची निवडणूक पुन्हा लढविली असता पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी जिद्द न सोडता बार्शी नगरपालिका एकतर्फी सत्ता हस्तगत केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर राऊत यांनी सेनेची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.