घनसावंगी मतदारसंघातील तिरंगी लढतीत ४५.८८ टक्के मते घेऊन विजय मिळवलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांना प्रचारात वैयक्तिक टीकेचे धनी व्हावे लागले. परंतु आरोप-प्रत्यारोपांचे  फासे पडण्याऐवजी ‘उत्तर सरळ सोपे, निवडून येणार टोपे’ अशी घोषणा देत समर्थकांनी प्रचारयंत्रणा राबवली. झालेल्या मतदानापैकी ४६ टक्के मते घेऊन ४३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने टोपे निवडून आले.
टोपे यांची निवडून येण्याची ही चौथी वेळ. १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवून ते पराभूत झाले होते. वडील अंकुश टोपे यांच्याप्रमाणेच राजेश टोपे यांच्या पाठीशीही निवडणुकांचा अनुभव जमा झाला आहे. या निवडणुकीत अंकुशराव प्रचार व नियोजनात नेहमीप्रमाणे सक्रिय होतेच. राजेश यांच्यापेक्षा अंकुशरावांच्या नियोजनाचीच चर्चा या निवडणुकीतही होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजपचे उमेदवार विलास खरात हे त्यांचे जुने राजकीय विरोधक. खरात हे १९८५ ते १९९५ या दशकात काँग्रेसचे आमदार राहिले. १९९५ मध्ये शिवसेनेच्या शिवाजी चोथे यांनी खरात यांचा पराभव केला. पुढे १९९९ व २००४ मध्ये चोथे यांचा टोपे यांनी पराभव केला. २००४ मध्ये अपक्ष लढून खरात पराभूत झाले. टोपे व खरात यांचा निवडणुकीसंदर्भात पूर्वानुभव असणारे चोथे या वेळेस उमेदवारीबाबत सावध भूमिकेत राहिले. युती तुटल्यावर खरात भाजपकडून उभे राहणार हे स्पष्ट होताच चोथे यांनी निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे डॉ. हिकमत उढाण यांना सेनेची उमेदवारी मिळाली. परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. झालेल्या मतदानापैकी केवळ १.६७ टक्के मते घेणारे मनसे उमेदवार चौथ्या क्रमांकावर, तर १.२९ टक्के मते घेऊन काँग्रेसचा पाचवा क्रमांक राहिला.
विरोधकांची टोपेविरोधी भाषणाची आतषबाजी मतदारांनी ऐकली. परंतु सर्वाधिक मते त्यांच्याच पारडय़ात टाकली! प्रत्येक गावापर्यंत संपर्क व प्रचारयंत्रणा यामुळे टोपेंचा विजय सोपा झाला. मतांची जुळवाजुळव करण्याकडे कमी व टीका करण्यात अधिक वेळ विरोधकांनी घालविला. राजेश यांच्या विजयासाठी अंकुशरावांचा विरोधकांशी संघर्ष या निवडणुकीतही कायम होता. पूर्वी स्वत:साठी व आता पुत्रासाठी हा संघर्ष मागील पानावरून पुढील पानावर सुरू होता. १९७२ मध्ये वयाच्या ऐन तिशीत अण्णासाहेब उढाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याशी संघर्ष करून अंकुशराव विधानसभेत पोहोचले. १९९१ मध्ये लोकसभेवर निवडून येण्यापर्यंतचा काळ संघर्ष व एका अर्थाने विजनवासाचा होता. १९८५, १९९० व १९९५ या तिन्ही निवडणुकांत त्यांना काँग्रेसने विधानसभेचे तिकीट नाकारले. पुढे १९९९ मध्ये पुत्र राजेश यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देऊन आमदार केले, तेव्हापासून राजेश यांच्या विजयासाठी सलग चौथ्या निवडणुकीत ते सक्रिय राहिले. या वेळेसही जुने राजकीय विरोधक खरात यांच्याशीच त्यांचा संघर्ष राहिला.
खरात यांचा (१९८५ ते ९५) १० वर्षांचा आमदारकीचा काळ अंकुशरावांसाठी अधिक संघर्षांचा होता. १९९८ मध्ये त्यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी नाकारली. तत्पूर्वी १९९६ मध्ये त्यांच्याऐवजी राजेश यांना उमेदवारी दिली. जिल्हा बँक, पहिली लोकनिर्वाचित जिल्हा परिषद, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद आदींबाबत त्यांचा काँग्रेसअंतर्गत गटबाजीत संघर्ष सुरू राहिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही हा संघर्ष काही प्रमाणावर सुरू होता. जि. प. निवडणुकीत पक्षाच्या अपयशानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद सोडावे लागले. या संघर्षांच्या कारणांची मीमांसा स्वतंत्र होऊ शकेल. परंतु वयाची सत्तरी उलटूनही मुलाच्या विजयासाठी त्यांचा संघर्ष या निवडणुकीतही कायम होता.