राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील मृत्यूदर वाढल्याची माहिती दिली आहे. राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या परिस्थितीला घाबरण्याची गरज नसून काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगत राज्यातील जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे. ट्रॅकिंग टेस्टींग आणि ट्रीटमेंट या तीन गोष्टींवर भर देण्यास केंद्रीय पथकाने सांगितलं असून त्याच दिशेने महाराष्ट्र करोनाशी दोन हात करत असल्याचंही टोपे म्हणाले आहेत. तसेच करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं यासंदर्भातील माहितीही टोपेंनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींची अधीक काळजी घेण्याची आणि त्यांची नोंद योग्य पद्धतीने ठेवण्याची गरज असल्याचं मत टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एकूण पाच टक्के रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर असल्याची माहिती दिली. अतिदक्षताविभागामध्ये उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या रुग्णालयामध्ये असणाऱ्या रुग्णांच्या ३.८ टक्के असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं आहे. मात्र असं असलं तरी मागील आठ दिवसांमध्ये मृत्यूदर अडीच वरुन ०.४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्यातील जनतेनं घाबरण्याचं कारण नाहीय. बेड, आयसीयू बेड उपलब्ध आहेत. अचानक रुग्ण संख्येत वाढ झाल्याने कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हियर म्हणजेच करोना कालावधी घ्यायची दक्षता यासंदर्भात आपण अधिक जागृक राहण्याची गरज असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> आपण देशातील लोकांना लस देण्याऐवजी लसीचे डोस इतर देशांना दान करतोय : उच्च न्यायालय

दुसऱ्या लाटेमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संसर्गाची इफेक्टीव्हीटी जास्त आहे. म्हणजेच कुटुंबामध्ये एका व्यक्तीला झाला की तो सर्वांना होतोय. त्यामुळेच एसएमएस पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा असं मत टोपेंनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीमध्ये ट्रॅकिंग आपल्याला एकास २० किंवा एकास ३० पर्यंत घेऊन जाण्याची गरज असल्याची भूमिका आम्ही मांडल्याचं टोपेंनी सांगितलं. सध्याच्या पद्धतीमध्ये अडचणी अनेक आहेत कारण आधी आपण क्लोजडाऊन केलं होतं आता मात्र सर्व गोष्टी सुरु करण्यात आला आहेत. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात असणारे हाय रिस्क कॉनटॅक्ट म्हणजेच कुटुंबातील लोकांना ट्रेस करता येतं. पण लो रिस्क कॉनटॅक्ट ट्रेस करणं कठीण जातं आहे, असं टोपेंनी सांगितलं. यासंदर्भात उदाहरण देताना त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्म गेलेली व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आलेली असते तर ती कोणाकोणाच्या संपर्कात आली हे शोधून काढणं थोडं अडचणीचं ठरतं असं सांगितलं. याच लो रिस्क कॉनटॅक्ट ट्रेसिंगसंदर्भातील अडचण मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांसमोर प्राकर्षाने मांडलीय, असंही टोपेंनी स्पष्ट केलं. तसेच ही बैठक दोन तास चालल्याचंही त्यांनी सांगितलं. अशापद्धतीने ट्रेसिंग करणं अवघड असलं तरी यामध्ये जाणीवपूर्वक पद्धतीने राज्य सरकारला लक्ष घालावं लागेल अशा सुचना आम्हाला मिळाल्या असून आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत, असं टोपेंनी सांगितलं आहे.