सामान्य जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी काल येथे बोलताना केली.
कडेगाव ग्रामीण रूग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  समारंभास सभापती आसमा तांबोळी, उपसभापती मोहन मोरे, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन शांतारामबापू कदम, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना करून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले,की जिल्ह्यात या योजनेसाठी १८ रूग्णालयांची निवड केली असून या रूग्णालयांच्या माध्यमातून आत्तापर्यंत ४ हजार ६३० रूग्णांना लाभ दिला असून यासाठी जवळपास १२ कोटीचा निधी आला आहे.  यापुढील काळात गरजू आणि पात्र रूग्णांना उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यास आरोग्य विभागाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी जिल्ह्यातील निवडलेल्या १८ रूग्णालयांनी जिल्हयातील पात्र रूग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक असून याबाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा देऊन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले,की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभाथीर्ंवर कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रिपड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, जळीत, स्त्री रोग, बाल रोग, त्वचा रोग, नेत्र शस्त्रक्रिया कृत्रिम अवयव, सांधा व फुफ्फुस आजारावरील उपचार, एंडोक्राईन व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात.  या योजनेचा महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे वरील निवडक व गंभीर आजारांसाठी रूग्णाला मान्यताप्राप्त रूग्णालयांत कोणतीही रक्कम द्यावी लागणार नसल्याचेही डॉ. कदम म्हणाले.
प्रारंभी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून यापुढेही ही योजना अधिक गतिमान केली जाईल.  या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. या वेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लोखंडे तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  
समारंभास तहसीलदार हेमंत निकम, गटविकास अधिकारी संतोश जोशी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मालन मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी,  जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी,  कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.