काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांना करोनाची लागण झाल्याने प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना मुंबईत हलविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. मात्र, सातव यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सातव यांच्यावर सध्या पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, ते उपचारांना साथ देत आहे. तसेच त्यांच्या ऑक्सिजन पातळीमध्ये देखील वाढ होत असल्याने त्यांना कुठे ही हलविण्यात येणार नसल्याचं राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी माहिती दिली. यावेळी जहांगीर रूग्णालयातील डॉ. सत्यजीतसिंग गील हे देखील उपस्थित होते.

“राजीव सातव हे २५ एप्रिलला करोना उपचारासाठी जहांगीरमध्ये रूग्णालयात दाखल झाले. त्यांची सुरुवातीला तब्येत ठीक होती. पण अचानक प्रकृती बिघडली होती. आता त्यांच्या तब्येतीमध्ये पुन्हा सुधारणा होत असून, ऑक्सिजन पातळी देखील वाढली आहे,” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.