काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुटाबुटातील सरकार, असा आरोप केला असला तरी तो बिनबुडाचा असून त्यांच्या विधानाला फारसे महत्त्व देत नसल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली. गुरुवारी सकाळी नागपूर विमानतळावर स्वागत झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर हरयाणा सरकारतर्फे सुरू असलेली कारवाई सूडबुद्धीने होत आहे का, असे विचारल्यावर ते म्हणाले, सरकार कुठलीही कारवाई सूडबुद्धीतून करीत नाही. वढेरा प्रकरणाची चौकशी सुरू असून जे सत्य आहे ते समोर येईल. राहुल गांधी यांच्या तेलंगणा दौऱ्यासंदर्भात काही बोलायचे नाही. मात्र कुठले सरकार जनहिताचे निर्णय घेते, हे जनतेला माहिती आहे.
केंद्रात सत्ता आल्यावर भाजप सरकारने वर्षभरात गोरगरीब आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असून यापुढे शेतक री आत्महत्या कशा रोखता येतील त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यांत जाऊन नक्षल समस्येवर आढावा बैठक घेतली जात आहे. महाराष्ट्रात एकही बैठक झाली नव्हती. त्यातही विदर्भातील नक्षल समस्यांची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तानात झालेला हल्ला निषेधार्ह असून दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानकडून सहकार्य अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा निश्चित यशस्वी होईल. चीनसोबत संबंध सुधारले तर सीमावाद सुटेल.
संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे बैठकीच्या निमित्ताने नागपूरला आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणे स्वाभाविक असल्यामुळेच संघ कार्यालयात आलो. नागपूरला आलो की त्यांच्याशी चर्चा करतो. तशीच आजही केली, असे सांगून ही चर्चा कुठल्या विषयांवर झाली, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
राजनाथ-सरसंघचालक भेट
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या वेळी राजकीय स्थितीवर चर्चा केल्याचे मानले जात आहे. राज्यसभेत बहुमत नसल्याचे राम मंदिर उभारणीबाबत कायद्यात अडचणी येत असल्याचे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केले होते. त्या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. गृहमंत्री झाल्यानंतर आपली ही पहिलीच नागपूर भेट असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.