पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱयावर असतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये भेट घेतली. मोदी सरकार सत्तेवर आल्याला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सुमारे दोन तास बंद खोलीत ही चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, भूमी अधिग्रहण विधेयकासह काळा पैसा आणि सरकारची कामगिरी यावर बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली. गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात आले होते. सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने गुरुवारी सकाळी नागपूरमध्ये आले. त्यानंतर ते लगेचच हेडगेवार भवनकडे रवाना झाले. देशातील गरिबांच्या आणि शेतकऱयांच्या कल्याणासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी विमानतळाबाहेर पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला.