शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्यांपासून इतर प्रश्नांवर चर्चा करणे आवश्यक आहे. देशभरातील १९३ संघटनांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी कर्जमाफी आणि कृषिमालास हमीभाव या ही दोन विधेयके तयार केली असून ती मांडण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या मागणीसाठी एक मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. याशिवाय एक मेपासून धुळ्यातील विखरण या गावापासून शेतकरी सन्मान अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शेट्टी यांनी येथे दिली.

रविवारी येथे शेट्टी यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी संघर्ष समितीकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशभरात फिरून शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी कर्जमाफी आणि मालाला हमीभाव हे दोन विधेयक तयार केले आहेत. संसद अधिवेशनात खासगी विधेयकाच्या स्वरूपात ते मांडण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज आहे. यासंदर्भात दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयांवर संसदेचे विशेष अधिवेशन आजपर्यंत बोलविण्यात आले आहे. असे असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष अधिवेशन का नाही, असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला. त्यामुळेच असे अधिवेशन बोलविण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ात पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार आहे. समन्वय समितीतर्फे राज्यपालांचीही भेट घेण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

बाजार समित्यांमध्ये कृषिमाल खरेदी करूनही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक फसवणुकीमागे बाजार समिती, सहकार विभाग आणि व्यापारी यांचे संगनमत कारणीभूत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. व्यापाऱ्यांना परवाने देण्याची जबाबदारी बाजार समितीची असतांना पत नसलेल्या व्यापाऱ्यांना परवाने कसे दिले जातात, असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या फसवणुकीस कारणीभूत असणाऱ्या सहकार विभागासह सर्वाविरूध्द कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

महाराष्ट्र दिनापासून ‘शेतकरी सन्मान अभियान’

शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबत नसल्याने त्याविषयी एक ते १० मे या कालावधीत प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात शेतकरी सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हा या अभियानाचा उद्देश आहे. याअंतर्गत कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर असलेल्या विविध प्रकारच्या कर्जाची माहिती संकलित करणार आहेत. शिवाय ‘संघर्ष करू, पण आत्महत्या करणार नाही’ असे शपथपत्र भरून घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जर काही अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर त्यांना मदत केली जाणार असल्याचेही शेट्टी यांनी जाहीर केली. या अभियान यात्रेतंर्गत जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद अशा भागात भेट दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.