गेली लोकसभा निवडणूक भाजपबरोबर लढविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या साथीने लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. खासदार राजू शेट्टी यांच्या या निर्णयाने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

शेट्टींनी काही महिन्यांपूर्वीच भाजपशी मैत्री सोडली होती. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा यापूर्वीच केली आहे. शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. भाजपला झटकल्यानंतर शेट्टी यांनी त्यांचे एके काळचे कट्टर शत्रू शरद पवार यांच्याशी चांगलेच जुळवून घेतल्याचे मानले जाते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशीही हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात भाजपविरोधात भरभक्कम आघाडीला आकार देण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेने २०१४ मध्ये भाजपशी युती केली होती. परंतु त्यांचा भ्रमनिरास होऊ  लागला. त्यातच त्यांचे सहकारी सदाभाऊ  खोत हे मंत्री झाल्यानंतर तर प्8ाक्षामध्ये चांगलीच दुफळी माजली. तेव्हापासून शेट्टी भाजपविरोधात गेले होते.